महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रे आता संध्याकाळीदेखील सुरू राहण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

आता जर आरोग्य कर्मचारी उपल्ब्ध असल्यास ही लसीकरण मोहिम फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत नाही, तर दिवसातले 24 तास चालू राहू शकते, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

मुंबई : मुंबईतील 40 खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्यात 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षांपेक्षा जास्त, काही आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. परंतु, आता जर आरोग्य कर्मचारी उपल्ब्ध असल्यास ही लसीकरण मोहिम फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत नाही, तर दिवसातले 24 तास चालू राहू शकते, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. संध्याकाळच्या शिफ्टमध्येदेखील लसीकरण सुरू केल्यास, लसीकरणाचा वेग वाढू शकतो, त्यामुळे राज्य सरकारदेखील या निर्णयास अनुकूल आहे. आम्ही लसीकरण वेळांमध्ये बदलांची योजना आखत आहोत आणि मागणीनुसार ते वाढवू शकतो. परंतु, दिवसातले 24 तास लसीकरण मोहिम राबवणं शक्य नसल्याचं राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले.

जळगाव दुर्घटना: रक्षणकर्त्यांनीच केले होस्टेलच्या मुलींसोबत वाईट कृत्य

आरोग्य सेवा संचालनालय संचालक (कुटुंब कल्याण) डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या की, शहरी केंद्रांवर संध्याकाळच्या वेळेसही लसीकरण सुरू ठेवण्याची गरज ग्रामीणपेक्षा शहरी भागात जास्त असेल. बुधवारी, महाराष्ट्रात 41,240 लोकांचे लसीकरण करण्यात आले, त्यापैकी 27,842 ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त, काही आजारांनी ग्रस्त असलेले नागरिक आहेत. मागील दोन दिवसांच्या तुलनेत ही संख्या जास्त होती. कोविन सॉफ्टवेअर  सहजतेने कार्य करीत असताना, केंद्रे तिसर्‍या दिवशी अधिक लोकांना लसीकरण करण्यात सक्षम झाली. वांद्रे कुर्ला संकुलातील केंद्राचे डीन डॉ. राजेश डेरे म्हणाले की, "तेथे कोणत्याही प्रकारची गर्दी होत नाही आणि दिवसाला 3,000 पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण होऊ शकतं."

धक्कादायक! कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेताच भिवंडीतील व्यक्तीचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने मुंबईतील लसीकरण केंद्रे चालविण्यासाठी 29 खासगी रुग्णालयांना मंजुरी दिली असून,  त्यापैकी 13 रूग्णालये आजपासून सुरू होणार आहेत. यामुळे सरकारी लसीकरण केंद्रांवरचा ताण कमी होईल. खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त 2 हजार डोस देण्यात आले आहेत. लसीकरण करण्यासाठी खाजगी रूग्णालये जास्तीत जास्त 250 रुपये शुल्क घेऊ शकतात, परंतु लसीकरणानंतर एखादी गंभीर  घटना घडल्यास , त्याच्या उपचारांसाठी ते शुल्क आकारू शकतात की नाही याची स्पष्टता नाही. हे सरकारी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य आहे. मुत्र रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना जास्त काळ रांगेत उभं राहावं लागू नये, म्हणून डायलिसिस केंद्रांना लसी देण्याची परवानगी देण्याचीही पालिकेची योजना आहे.

संबंधित बातम्या