सातारा, अमरावती जिल्ह्यासंह तीन जिल्ह्यात कोरोनाचा विदेशी स्ट्रेन ?

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मुबंई: देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असतानाही दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात कोरोना केसेसमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. यवतमाळ, अमरावती, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन पसरत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. यावर राज्याच्या आरोग्य विभागाने खुलासा केला आहे.

‘’राज्यातील सातारा, अमरावती, पुणे, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दैनंदिन वाढत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराची कारणे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच या भागातील कोरोनाच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झाले आहेत का या संदर्भात पाहणी करण्यात येत आहे,'' असे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा विळखा; या नेत्यांना झाली दुसऱ्यांदा लागण

दरम्यान ''सातारा, अमरावती, यवतमाळ, पुणे येथील कोरोनाचे चार नमुने पुण्यातील बी.जे.महाविद्यालयात तपासण्यात आले असून जिल्ह्यामधील कोरोनाच्या विषाणूमध्ये आफ्रिका, ब्रिटन, ब्राझीलमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेन सारखा कोणताही स्ट्रेन आढळून आलेला नाही. तसेच पुण्यातील कोरोनाचे 12 नमुने तपासण्य़ात आले त्य़ामध्येही कोणत्याही स्वरुपाचा परदेशी कोरोनाचा स्ट्रेन आढळला नाही,''असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्य़ामधील आणखी काही कोरोनाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी संस्था या संस्थाकडे अधिक तपासणी करण्याकरिता पाठवण्यात आले आहेत. आणि या संदर्भातील अहवाल पुढच्या आठवड्य़ात येणार असल्य़ाचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या