कोकण कन्या, मांडवी एक्सप्रेस सुरू करा

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे गोवा व कोकणातील जनतेला दिलासा मिळाला, तरी गोवा व कोकणाशी संबंधित असलेले मुंबईतील नागरिक गोवा व कोकणात जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

पेडणे:  सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे गोवा व कोकणातील जनतेला दिलासा मिळाला, तरी गोवा व कोकणाशी संबंधित असलेले मुंबईतील नागरिक गोवा व कोकणात जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. अद्यापही अव्वाच्या सव्वा भाडे देऊन बस प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याने सर्वसामान्य प्रवासी हवालदिल झाला आहे. मालपे पेडणे येथील बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू झाल्याने मुंबईकडे ये-जा करण्यासाठी सोयीचे झाल्याने मडगाव दिवा पॅसेंजर, कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. 

लॉकडाऊन काळात सरकारने महाराष्ट्रातून अन्य राज्यात रेल्वेद्वारे अन्य राज्यातील नागरिकांची जाण्याची सोय केली, परंतु राज्यातील विशेषतः कोकणातील नागरिकांना मुंबईतून आपल्या गावी जाण्यासाठी किंवा गावातून मुंबईकडे येण्यासाठी अजुनही रेल्वे सुरू होण्याची वाट पहावी लागत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने सद्यस्थितीत सुरू केलेल्या सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या एक्स्प्रेस असल्याने मुंबईच्या बाहेरून जातात. लोकल सेवा बंद असल्याने त्या स्टेशनवर पोहचणे कठीण होत आहे. जर मडगाव दिवा पॅसेंजर, कोकण कन्या एक्स्प्रेस व मांडवी एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्यास मुंबईत राहणारा कोकणी माणूस निदान आता तरी आपल्या गावी कमी पैशात जाऊ शकेल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ वरील तीन गाड्या सुरू करून गोवा व कोकणातील जनतेला दिलासा द्यावा, अशी सर्व सामान्यांची मागणी आहे. 

मुंबईला जाण्यासाठी गेला सव्वा महिना सिंधुदुर्गासह गोव्यातील नागरिकांना रेल्वेशिवाय दुसरा चांगला पर्याय नव्हता. त्यामुळे कोकण रेल्वेच्या गाड्या बंद झाल्या, नंतर अव्वाच्या सव्वा भाडे देऊन बारा ते चौदा तासांचा कंटाळवाणा बसप्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. या कालावधीत दोन ते तीन हजार रुपयांचे बस भाडे आकारले जात होते. २२ प्रवासी घेऊनच बस नेण्याचे बंधन असल्याने बस व्यावसायिकांपुढे प्रवास भाडे वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. आता रेल्वे सेवा सुरू झाली, परंतु मुंबईतील नागरिकांना कोकण रेल्वे अभावी कोकणात येण्यासाठी बस किंवा खासगी प्रवासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गेला सव्वा महिना झालेली आमची कोंडी मडगाव दिवा पॅसेंजर, कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस या गाड्या सुरू करून दूर करावी, अशी मागणी गोवा, कोकण ते  मुंबईपर्यंतच्या प्रवाशातून होत आहे.

संबंधित बातम्या