पुणे: प्रत्येक भारतीय ज्याची उत्कंठतेने वाट पाहतोय, त्या कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीची देशातील पहिली मानवी चाचणी बुधवारी पुण्यात झाली. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील ही ऐतिहासिक घटना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये घडली.
दुपारचा बरोबर एक वाजला होता. भारती हॉस्पिटलच्या तळ मजल्यावरील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) एकच धावपळ सुरू होती. वॉर्ड बॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत सगळ्यांमध्ये ओसंडून वाहणारा उत्साह होता. कारणही तसेच होते. याच ठिकाणी कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणारी देशातील पहिली मानवी चाचणी होणार होती. वेळ जवळ आलेली. ‘सकाळ’ने दिलेली बातमी राज्यभर व्हायरल झाली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या मानवी चाचणीकडे लागले होते. लस कशी देणार, कोण देणार, कोणाला देणार, किती जणांना देणार असे एका मागोमाग एक प्रश्न येथे उपस्थित असणाऱ्यांप्रमाणेच या बातमीकडे डोळे लावून बसलेल्यांना पडले होते. इतक्यात डॉक्टरांचे एक पथक पावले टाकत ‘ओपीडी’च्या दिशेने आले. त्यात वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी होते. त्यांच्याबरोबर डॉ. अस्मिता जगताप, डॉ. सोनाली पालकर, डॉ. जितेंद्र ओसवाल होते.
त्यांच्याबरोबर अजून एक माणूस होता. पस्तीशीच्या दरम्यान त्याचे वय होते. एका टेबलसमोर ठेवलेल्या खुर्चीत तो पस्तीशीचा माणूस बसला. तोच होता पहिला स्वयंसेवक. ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी‘, ‘ॲस्टॅजेनेका‘ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली ‘कोविशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक पहिली लस याला टोचली जाणार होती.
या स्वयंसेवकाच्या शरीराचे तापमान बघितले. त्याच्या रक्तदाबाची नोंद झाली. हृदयाचे ठोके मोजले. त्याची तपशीलवार नोंद कागदावर करण्यात आली. त्यानंतर या व्यक्तीला डॉ. ललवाणी यांनी लस दिली.
भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लशीची पहिली चाचणी:
अशी केली स्वयंसेवकांची निवड
- वय १८ वर्षांपेक्षा जास्त
- कोरोना निदान चाचणी निगेटिव्ह हवी
- कोरोनाच्या अँटिबॉडिस् निगेटिव्ह असावी
- लशीचे फायदे- तोटे स्वयंसेवकांना सांगितले.
- ताप, सर्दी, खोकला नसावा.
पुढे काय होणार?
- सुरवातीला शंभर जणांवर लशीच्या सुरक्षिततेची चाचणी होणार
- सुरक्षिततेची खात्रीनंतर तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू होईल
- लस दिल्यानंतर शरीरात किती प्रतिकारशक्ती (अँटिबॉडिस्) तयार होतात, ते पाहिले जाईल
- सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती या दोन्ही निकषांचा अभ्यास होणार
- देशातील सर्व केंद्रातून या दोन्हीची माहिती संकलित होईल
अठ्ठाविसाव्या दिवशी दुसरा डोस
लशीचा पहिला डोस दिल्यानंतर आजपासून अठ्ठाविसाव्या दिवशी दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी होईल. ९० व्या दिवशी त्यांची फोनवरून चौकशी केली जाईल आणि १८० व्या दिवशी ते परत हॉस्पिटलमध्ये तपासण्यासाठी येतील. या दरम्यान त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत लागली तर त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळेच रुग्णालयाच्या पाच किलोमीटर परिसरातील व्यक्तींनाच स्वयंसेवक म्हणून घेतले असल्याचेही डॉ. ललवाणी यांनी सांगितले.