कोविड-१९ : महाराष्ट्रात मृत्युदरात ११.५ टक्क्यांनी घसरण

पीटीआय
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येमध्ये गेल्या तीन आठवड्यात सुमारे ७ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मृत्युदरातही ११.५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे निरीक्षण आरोग्य मंत्रालयाने नोंदविले. 

नवी दिल्ली: महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येमध्ये गेल्या तीन आठवड्यात सुमारे ७ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मृत्युदरातही ११.५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे निरीक्षण आरोग्य मंत्रालयाने नोंदविले. 

दरम्यान, देशात कोविड-१९ महामारीबाबतचे दुसरे सिरो सर्वेक्षण सुरू झाले असून लवकरच त्याचे निकाल येतील असे भारतीय आयर्विज्ञान संशोधन परिषदेतर्फे  (आयसीएमआर) आज सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रूग्ण व मृत्यूमुखी पडणारेही सध्या महाराष्ट्रासह फक्त ५ राज्यांतच आढळून येत आहेत. दिल्लीत रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे, त्याबाबत सरकारने आरोग्य नियमावलीचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, अशी सूचना केली आहे.  सचिव राजेश भूषण और आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत कोरोनास्थितीची माहिती दिली. जगाच्या तुलनेत भारतातील सक्रिय रुग्णसंख्या व मृत्युदर अजूनही कमी आहे. देशात १० लाख लोकांमागे ४९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. 

मास्कसक्ती फक्त समूहापुरती 
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे सक्तीचे आहे. मात्र याबाबत केंद्राचे दिशानिर्देश स्पष्ट आहेत, असे सांगून भूषण म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती घरात असते किंवा कोणी मोटारीतून एकटाच चाललेला असेल तर त्याच्यावर मास्कची सक्ती नाही. व्यायाम, सायकलिंग अन्य कारणांसाठी काही लोक एकत्र येत असतील तर त्यावेळी मास्क बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या