मुंबईत डब्यांमध्ये गर्दी कायम

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

स्थानकांत प्रवाशांमध्ये अंतर, तिकीट खिडक्‍यांवरही नियमांचे तीन-तेरा

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर या रेल्वेस्थानकांत चौथ्या दिवशी सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. चिन्हांकित जागेवरच प्रवासी उभे असल्याचे दिसले; मात्र लोकलचे डबे आणि तिकीट खिडक्‍यांवर अत्यावश्‍यक सेवेतील प्रवाशांची गर्दी कायम होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दररोज मध्य रेल्वेवर 200 आणि पश्‍चिम रेल्वेवर 162 विशेष लोकल फेऱ्या सुरू आहेत. बारा डब्यांच्या एका लोकलमध्ये कमाल 700 प्रवाशांची वाहतूक करण्याचे निर्देश आहेत; त्याप्रमाणे एका डब्यात 59 प्रवाशांनाच मुभा आहे; परंतु सध्या प्रत्येक डब्यात दुप्पट प्रवासी दिसत असून, उभ्यानेही प्रवास केला जात आहे. त्यामुळे कोव्हिड-19 च्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने 15 जूनला मध्यरात्री जाहीर केला. त्यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी लोकलमध्ये नगण्य प्रवासी होते. मंगळवारी आणि बुधवारी स्थानकांत प्रवाशांच्या रांगा लागल्या. गुरुवारी, चौथ्या दिवशी प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली. त्यामुळे लोकल डब्यांमधील गर्दी कमी करण्याचे आव्हान आता मध्य आणि पश्‍चिम रेल्वेसमोर आहे.

स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षाच
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करताना क्‍यूआर कोड असलेले स्मार्ट कार्ड देण्यात येणार होते. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख पटणे सोपे झाले असते. अद्याप असे स्मार्ट कार्ड देण्यात आले नसल्याने तिकीट, पास काढण्याठी अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. स्थानकांवर मोजक्‍या तिकीट खिडक्‍या उघडण्यात आल्या आहेत. अनेकांच्या पासची मुदत संपली आहे. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी पासची मुदत वाढवण्यासाठी प्रवाशांच्या रांगा लागत आहेत.

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने सर्व विभागांतील रोस्टर 50 टक्के भरायला हवे, असा आदेश काढला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी लोकल उत्तम पर्याय असला, तरी सोशल डिस्टन्सिंग पायदळी तुडवले जात आहे. फलाट, तिकीट घराचे व्हिडीओ, छायाचित्रे प्रसिद्ध करून रेल्वे व सरकारी यंत्रणा स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे कोरोनाचा स्फोट होऊ शकतो.
- श्‍याम उबाळे, सचिव, कल्याण-कसारा कर्जत प्रवासी संघटना.

संबंधित बातम्या