जळगावात डाळीला टाल्कचा लेप

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

अडीच लाखांचा साठा जप्त ; अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव

उडीद मोगर व मूंग डाळीला मॅग्नेशिअम सिलिकेट असलेले टाल्क हे केमिकल लावून पॉलिश करून ठेवलेला अडीच लाखांचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत जप्त करण्यात आला. हे शरीरासाठी घातक रसायनही या ठिकाणाहून जप्त करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे वाहतूक व एकूणच उत्पादन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काही पुरवठादार मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त माल पुरवठा करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. अशीच गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकने जळगाव एमआयडीसीतील एका डाळ प्रक्रिया उद्योग असलेल्या मिलवर अचानक छापा टाकून तपासणी केली. त्यात मिलमधील उडीद मोगर व मुंगडाळीला खाद्यरंग व सॉफ्ट स्टोन पावडर लावली जात असल्याचे आढळून आले. अशा भेसळयुक्त डाळीचा २,३८८ किलो साठ्याचे नमुने घेण्यात आले. डाळीला कोणत्याही प्रकारचे रंग लावणे अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा असल्याने यापैकी ७५८ किलोचा साठा जप्त करण्यात आला. सहाय्यक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी ही कारवाई केली.

काय आहे ‘सॉफ्ट स्टोन’?
या डाळींना लावले जात असलेले सॉफ्ट स्टोन हे टेल्कम पावडर (चेहऱ्याला लावली जाणारी) मध्ये वापरले जाते. त्यात मॅग्नेशिअम सिलिकेट नावाचे रसायन असते. या रसायनाचे शरीरासाठी अत्यंत घातक परिणाम होतात.

संबंधित बातम्या