मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवास मातोश्रीला 'उडवण्याची' धमकी

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

सुरक्षेत वाढ; गुन्हे शाखेकडून तपास सुरू

मुंबई:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी दोन निनावी दूरध्वनी आल्यानंतर, त्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने कथित स्वरूपात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.  

शनिवारी (ता. ५) रात्री ११ च्या सुमारास पहिला दूरध्वनी ‘मातोश्री’च्या स्वागत कक्षाला आला होता. त्यात आपण दुबईवरून बोलत असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे असल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. स्वागत कक्षावरून फोन बंद करण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने पुन्हा दूरध्वनी केला. यावेळी दूरध्वनी बंद केल्यास ‘मातोश्री’ उडवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणानंतर याबाबतची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी पोलिसांना याप्रकरणी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने ‘मातोश्री’वर धाव घेतली. गुन्हे शाखेसह राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत. 

गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
‘मातोश्री’वर आलेल्या दूरध्वनीवरील धमकीनंतर ‘मातोश्री’ निवासस्थानासोबतच ठाकरे कुटुंबाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या प्रकरणाची माहिती घेऊन आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गुन्हे शाखा सध्या याप्रकरणी तपास करत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्दल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली, तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. हे प्रकरण खूप गंभीर असून केंद्राने याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शिक्षा करावी अशा भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या