पानिपतावर लढला अवघा महाराष्ट्र..

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

अठराव्या शतकातील सर्वांत रक्तरंजित युद्ध हरियानातील पानिपतावर लढले गेले. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात १४ जानेवारी १७६१ रोजी भीषण रणसंग्राम झाला.

नागपूर :  अठराव्या शतकातील सर्वांत रक्तरंजित युद्ध हरियानातील पानिपतावर लढले गेले. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात १४ जानेवारी १७६१ रोजी भीषण रणसंग्राम झाला. दोन्ही बाजूंनी मोठा संहार झाला. या युद्धात दिल्लीच्या रक्षणासाठी पानिपतावर लढता लढता देह ठेवलेल्या दोनशेपेक्षा जास्त मराठा सरदारांची नावे जगासमोर आली आहेत.

पानिपतावर अनेक बखरी, कादंबऱ्या, पुस्तके लिहिली गेली. आता जसजशी ऐतिहासिक साधने, कागदपत्रे, दस्तावेज हाती लागत आहेत तसा इतिहास समोर येत आहे. पानिपतावरील ताज्या बखरीचे वैशिष्ट्य म्हणजे  त्यात कल्पनाविलास  आढळत नाही. पानिपतावर ज्या काही लढाया झाल्या त्यात कामी आलेल्या सव्वादोनशेच्या आसपास मराठा सरदारांच्या आडनावासहित नावांचा उल्लेख आहे. ही आडनावे वाचल्यानंतर आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम पाहून प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो.

कोल्हापूर संस्थानचे अमात्य कृष्णराव पंडित  यांच्यासाठी दरबारी कारकून रघुनाथ यादव चित्रगुप्त याने ‘बखर पानिपत’ची या नावाने दस्तावेज लिहिला. इतर बखरी गोपिकाबाई पेशवा यांच्यासाठी लिहिल्या होत्या. अर्थात त्यात विश्वासराव, भाऊसाहेब पेशवे, देवधर्म, तीर्थयात्रा याचेच रसभरीत वर्णन केल्याचे आढळते. चित्रगुप्त यांनी १७६१ मध्येच लिहिलेल्या बखरीत तत्कालीन राजकारण, परिस्थिती आणि प्रत्यक्ष युद्ध यांचे वर्णन केले आहे. मो़डी लिपीत असलेला हा दस्तावेज इंग्रजांनी इंग्लंडला नेला. कागदपत्रे शोधण्यासाठी इतिहासकार उदय एस. कुलकर्णी  २०१३ मध्ये  इंग्लंडला गेले.

रॅायल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंडच्या माध्यमातून कागदपत्रे मिळविली.  या मोडी लिपीतील कागदपत्रांचा अनुवाद करीत उदय कुलकर्णी यांनी पानिपतावर लढलेल्या मराठा सरदारांची नावे जगासमोर आणली. विशेष म्हणजे या बखरीत अहमदशाह अब्दालीच्या सैन्यातील ठार झालेल्या २१० उज्बेक, अफगाणी पठाण, रोहिले या मुस्लिम तर  मराठ्यांच्या बाजूने  लढणारे  राजपूत, भील, राठवड, पंजाबी या हिंदू सरदारांची नावेही आहेत. 

संबंधित बातम्या