होम क्‍वारंटाईन वृद्धाचा मृतदेह घरातच सडला

Dainik Gomantak
गुरुवार, 25 जून 2020

जामसंडेतील प्रकार; कुटुंबीय राहत होते मृतदेहासोबत

देवगड

होम क्‍वारंटाईन असलेल्या एका वृद्धाचा मृतदेह घरातच सडलेल्या अवस्थेत सापडला. जामसंडे गणेशनगर परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. भास्कर रामचंद्र दहिबांवकर (वय80) असे त्यांचे नाव आहे. वृद्धाच्या मृतदेहासमवेत त्यांची पत्नी व मुलगा घरातच राहत होते; मात्र त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, नगरपंचायतीने पुढाकार घेत मृतदेहावर अंत्यविधी केले.
याबाबतची माहिती अशी ः जामसंडे गणेशनगर येथे भास्कर दहिबांवकर पत्नी, मुलगा यांच्या समवेत राहत होते. लॉकडाउनच्या आधी ते मुंबईला गेले होते आणि तेथेच अडकले. कोरोनाच्या कालावधीनंतर सुमारे अडीच महिन्यांनंतर ते गावी जामसंडे गणेशनगर येथील घरी आले. मुंबईहून परतल्यावर पती, पत्नी, मुलगा होम क्‍वारंटाईन होते. मंगळवारी उशिरा त्यांच्या घरातून उग्र वास येऊ लागल्यामुळे परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका हर्षा ठाकूर यांना माहिती दिली. सौ. ठाकूर यांनी खातरजमा करीत पुढील आवश्‍यक हालचाली केल्या.
माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. श्री. कातिवले यांच्यासह हवालदार एस. डी. कांबळे, गणेश चव्हाण, एफ. जी. आगा यांनी पाहणी केली. त्यावेळी भास्कर दहिबांवकर यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांचा मुलगा, पत्नीही घरात होती. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे तत्काळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांना बोलावून फवारणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी येऊन दहिबांवकर यांच्या मृतदेहाची पाहणी केली. त्यांचा मृत्यू सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा आणि मृतदेह पूर्ण कुजलेल्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने दहिबांवकर यांचा मृतदेह रात्री घराबाहेर काढून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. दहिबांवकर यांची पत्नी व मुलाचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने मृतदेहासमवेतच राहत होते. दुर्गंधी पसरली तरीही त्यांना कसलीही जाणीव झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षितता म्हणून आज नगरपंचायतीच्या वतीने दहिबांवकर यांच्या घरासह परिसरात फवारणी करण्यात आली. दहिबांवकर कुटुंब मुंबईहून गावी परतल्याची माहिती नव्हती, असे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या सेवावृत्तीचे कौतुक
सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. त्यातच कोरोनामुळे सध्या अशा घटनांबाबत भीतीचे वातावरण आहे, तरीही नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मृतदेह धाडसाने बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. या कर्मचाऱ्यांच्या या सेवावृत्तीचे आज शहरात कौतुक झाले.

संबंधित बातम्या