दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची कसून चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभ्या ठाकलेल्या दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या सिनेतारकांची आज अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कसून चौकशी केली.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासातून रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. सध्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभ्या ठाकलेल्या दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या सिनेतारकांची आज अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कसून चौकशी केली. या तिघीजणींच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली असून याप्रकरणी लवकरच अन्य काही सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली.

मागील २० तासांपासून चौकशी सुरू असलेल्या धर्मा प्रोडक्शनच्या क्षितीज प्रसादला एनसीबीने अटक केली. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आजचा शनिवारचा दिवस फार महत्त्वाचा होता. अभिनेत्री दीपिका पदुकोणला शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबीने बोलविले होते. त्यानुसार, दीपिका  हजर झाली. तर दुसरीकडे सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना सकाळी १०.३० वाजता बोलविले होते. मात्र श्रद्धा कपूरने १२ वाजेपर्यंत वेळ मागवून घेतली नंतर ती बारा वाजता एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.  सारा अली खान साडे बाराच्या सुमारास एनसीबी कार्यालयात पोचली. तोपर्यंत एनसीबीने दीपिकाच्या चौकशीला सुरवात केली होती. या चौकशीत दीपिकाने दिशाभूल करणारी माहिती दिली मात्र पुरावे समोर ठेवल्यानंतर तिने खरी माहिती देण्यास सुरवात केली. यावेळी दीपिकाने करिष्मासोबत चॅट केल्याचे  मान्य केले. २८ ऑक्टोबर २०१७ ला या चॅटमध्ये दोघी ड्रग्जविषयी बोलत होत्या. याबाबत स्पष्टीकरण देताना दीपिका म्हणाली की, ‘‘ आम्ही आमच्या वर्तुळात डूब घेतो. ही एक प्रकारची सिगारेट असते. यात ब-याच गोष्टी असतात.’’

संबंधित बातम्या