मुंबईतील ५० सेलिब्रिटी रडारवर; दीपिका पदुकोण, सारा एनसीबी चौकशीसाठी गोव्याहून मुंबईत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

दीपिकाची उद्या चौकशी होणार होती, परंतु तिने शनिवारी चौकशीसाठी येणार असल्याचे आता स्पष्ट केले आहे. सारा अली खानचीही याच दिवशी चौकशी होणार आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ दिल्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आपला तपास बॉलीवूडमधील कलाकारांवर केंद्रित केला आहे. आता तब्बल ५० सेलिब्रिटी त्यांच्या रडारवर आहेत त्यानुसार समन्स बजावलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सारा अली खान आज गोव्यातून मुंबईत दाखल झाल्या आहेत.  एनसीबीच्या चौकशीत दीपिका, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा आघाडीच्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या सर्वांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहेत. दीपिकाची उद्या (ता.२५) चौकशी होणार होती, परंतु तिने शनिवारी चौकशीसाठी येणार असल्याचे आता स्पष्ट केले आहे. सारा अली खानचीही याच दिवशी चौकशी होणार आहे. या दोघी आज गोव्यातून मुंबईत दाखल झाल्या.  या सर्वांची नावे जया साहाच्या चौकशीतून समोर आली आहेत. 

राकुलप्रीत सिंगचे उत्तर नाही
एनसीबीने अभिनेत्री राकुलप्रीत सिंगला चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र आपल्याला समन्स न मिळाल्याचे कारण सांगून ती एनसीबी कार्यालयात गेली नाही. याबाबत राकुलप्रीत सिंगला चौकशीसाठीचा समन्स पाठवण्यात आले होते. तिच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात एक फोन कॉलही समाविष्ट आहे,मात्र तिच्याकडून कोणतेच उत्तर मिळाले नसल्याचे  सांगण्यात आले.

सिमॉन खंबाटाची चौकशी
रियाने तिच्या जबाबात म्हटले आहे की,‘‘ केदारनाथ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत होता.’’ आता या प्रकरणी सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. यामध्ये अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी ग्रेड सिनेमांच्या निर्मात्यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रकरणात आधीच रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतरांना अटक करण्यात आली असून आज फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटाचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या