विकासकांनी कमी किमतीत घरे विकावीत

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

आर्थिक सद्यस्थितीनुसार केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा विकासकांना सल्ला

मुंबई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे देश आर्थिक खाईत लोटला गेला आहे. सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विकासकांनी घरे व जागांच्या किमती कमी करून त्यांची विक्री करावी, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी केले आहे. बाजारात सुधारणा होण्याची वाट न पाहता व्यवहार करावेत, कारण कोरोनाच्या महासंकटामुळे बाजार कधी सुधारेल याची शाश्‍वती नसल्याचा सल्लाही गोयल यांनी विकासकांना दिला.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी गुरुवारी (ता. 4) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधला. या वेळी कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार रेडी रेकनरचे दर कमी करण्याबाबत विचार करेल, पण आपल्याकडे सध्या असलेल्या घरांच्या किमती कमी करून बांधकाम व्यावसायिकांनी त्या विकायला हव्यात, असे आवाहन विकासकांना केले.

सरकारवर अवलंबून राहू नका!
सद्यस्थितीत साठ्यातील घरे कमी किमतीत विकणे हाच उत्तम उपाय असल्याचे सांगत, सरकारकडून मदत मिळेल, घर खरेदीची परिस्थिती सुधारेल या आशेवर राहू नका, असेही गोयल यांनी सांगितले. ज्यांनी घरे विकली आहेत, त्यांचा तोटा कमी झाला किंवा कर्जमुक्त होण्यास मदत झाल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.

...तर तोटा सरकारलाच!
शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना सरकारला रेडीरेकनर दराच्या चारपट अधिक दर द्यावा लागतो. त्यामुळे हे दर जर जास्त असतील, तर त्याचा तोटा हा सरकारलाच सहन करावा लागेल, असे बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या