गोव्याहून महाराष्ट्रात होणार थेट प्रवेश: बांदा-सटमटवाडी थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाका बंद

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

बांदा-सटमटवाडी हा थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाका आजपासून प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. गोव्याहून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी तपासणी नाका तयार करण्यात आला होता

सिंधुदुर्ग: राज्य शासनाने कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्याचे आदेश 25 नोव्हेंबरला दिले होते. काही ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग नाका उभा करण्यात आला होता.

त्यापैकीच बांदा-सटमटवाडी येथिल टोल नाक्‍यावर गोव्याहून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी तपासणी नाका तयार करण्यात आला होता; मात्र या नाक्‍यावर कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने हा तपासणी नाका आजपासून राज्य प्रशासनाकडून बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्र राज्य शासनाने कोरोनाच्या काळात राज्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. 25 नोव्हेंबरला बांदा-सटमटवाडी या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग नाका उभारण्यात आला होता. या ठकाणी महसूल, पोलिस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी 24 तास तैनात करण्यात आले होते. हा कोरोना तपासणी नाका आजपासून बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवरचा भार हलका झाला आहे. 

गोव्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात  520 व्यक्तींना कोरोनाविरोधी लस -

दरम्यान महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने राज्य शासनाने परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घातले होते. नाताळ आणि नविन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेवून राज्यांच्या सीमेवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाके उभे करण्यात आले होते. 25 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग-गोवा सीमेच्या महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे थर्मल स्क्रिनिंग नाके उभे करण्यात आले होते. 

या तपासणीमध्ये स्थानिक ये-जा करणाऱ्या वाहनांना सवलत देण्यात आली होती. या नाक्यांवर आरोग्य विभागाचे 3 कर्मचारी, महसूल विभागाचे 2 कर्मचारी, वाहतूक पोलिस शाखेचे 3 कर्मचारी कायमस्वरूपी तैनात ठेवण्यात आले होते; मात्र गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग असल्याने या नाक्‍यावर एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यामुळे हा नाका सुरू ठेवणे प्रशासनाला परवडले नाही. म्हणूनच आजपासून हा नाका प्रशासनाकडून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती महसुल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

 

संबंधित बातम्या