मुलासाठी डायपरच्या वादातून पत्नीला तोंडी तलाक

Dainik Gomantak
शुक्रवार, 22 मे 2020

पतीविरोधात नागपाडा पोलिसांकडे तक्रार दाखल

मुंबई

नागपाडा येथे दुकानातून मुलासाठी डायपर आणण्यावरून झालेला वाद थेट घटस्फोटापर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लॉकडाऊनच्या काळात पतीने दिलेला तोंडी तलाक मान्य नसल्यामुळे पत्नीने नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानुसार (2017) संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका मुस्लिम तरुणीचा विवाह 2015 मध्ये नागपाड्यातील बेलासिस रोड या ठिकाणी राहणाऱ्या तरुणासोबत झाला. या दाम्पत्याला अडीच वर्षांचा मुलगा आहे. या विवाहितेने 2018 मध्ये पतीच्या विरोधात मानसिक छळाची तक्रार दाखल केली होती. सात महिन्यांनी पतीने नातेवाइकांसमोर माफी मागितल्यानंतर हे दाम्पत्य पुन्हा एकत्र राहू लागले होते. काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीला मुलासाठी दुकानातून डायपर आणण्यास सांगितले. परंतु हे काम आपले नसल्याचे सांगत त्याने डायपर आणण्यास नकार दिला.
त्यावरून दोघांत वाद सुरू झाले. लहान मुलाचे काम तुझ्याकडून होत नाही का; तुझ्या भावाकडून डायपर घेऊन ये, असेही पतीने पत्नीला सुनावले. त्यानंतर त्याने पत्नीला तलाक देण्याची धमकी दिली. वाद वाढल्यावर त्याने पत्नीला तीन वेळा तलाक बोलून तुझा-माझा संबंध तुटला, असे सांगितले. त्यानंतर या महिलेने नागपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. नागपाडा पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानुसार 30 वर्षीय पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पत्नीला बेकायदा तलाक दिल्याचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या