डॉक्‍टर एकवटले अन्‌ मृत्यूलाही हरवले

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

सर्पदंशाने अत्यवस्थ बालिका वेगुर्लेत काळाच्या दाढेतून सुखरूप बाहेर

वेंगुर्ले

सर्पदंश झाल्याने चिमुरडीचे प्राण कंठाशी आले होते. घरच्यांनी ग्रामीण रुग्णालयात आणले खरे; पण क्षणाक्षणाला स्थिती हाताबाहेर जात होती. अशा वेळी शहरातील डॉक्‍टर आणि पथक देवदूतासारखे धावले आणि चिमुरडीने मृत्यूवरही मात केली.
तुळस-वाघेरीवाडी येथील श्रुतिका भागो खरात (वय 5) हिला काल (ता. 21) रात्री आठच्या सुमारास विषारी सर्पाने दंश केला. कुटुंबीयांच्या लक्षात यायला सुमारे दोन तास गेले. तिला लगेचच येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तत्काळ उपचार न झाल्यास अनर्थ घडणार होता; पण पथक एकत्र आले. चिमुरडीवर मध्यरात्री दोनपर्यंत उपचार सुरू ठेवले. प्रयत्नांना यश येऊन अखेर तिचे प्राण वाचले. येथील डॉ. अतुल मुळे यांनी डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. मयूर मणचेकर, डॉ. कोळमकर, डॉ. कपिल मेस्त्री, परिचारिका धोंड व चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
तुळस येथील गरीब कुटुंबातील श्रुतिकेला विषारी सर्पदंश झाला. कुटुंबाने येथील युवासेना शाखाप्रमुख वैभव फटजी यांना कल्पना दिली. त्यांनी शहरप्रमुख अजित राऊळ, उपशहरप्रमुख अभी मांजरेकर यांच्या मदतीने मुलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्पदंश होऊन दोन तास उलटल्याने तिचा पाय सुजला होता. शरीरावर परिणाम दिसण्यास सुरुवात झाली होती. रात्रपाळीचे डॉ. कोळमकर यांनी डॉ. मुळे, डॉ. प्रल्हाद यांच्याशी संपर्क साधला. प्रथमोपचारात दिलेल्या इंजेक्‍शनची रिऍक्‍शन आल्याने इतर डॉक्‍टरांच्या मदतीने दुसऱ्या पद्धतीने उपचार सुरू झाले. डॉ. मुळे, डॉ. प्रल्हाद, डॉ. मयूर, डॉ. कोळमकर, डॉ. कपिल मेस्त्री पथकाने अपुरी साधन सामग्री असतानासुद्धा उपचार सुरू ठेवले. पहाटेपर्यंत डॉ. कोळमकर आणि डॉ. कपिल मेस्त्री यांनी फॉलोअप घेतला. आता तिची प्रकृती उत्तम आहे. पुन्हा रक्तात विष मिसळण्याचा धोका असल्याने तिला 72 तास देखरेखीखाली ठेवल्याची माहिती डॉ. मुळे यांनी दिली आहे.

""उपचार प्रक्रियेत इतर डॉक्‍टर, नर्स यांचे सहकार्य मिळाल्याने मी धाडस केले. रुग्णालयात अत्यावश्‍यक सोईसुविधा नसताना आम्ही धाडस करून मुलीवर यशस्वी उपचार केले.''
- डॉ. अतुल मुळे, वैद्यकीय अधिकारी, वेंगुर्ले

संबंधित बातम्या