डॉक्टरच्या गर्भवती पत्नीने लिहिले थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

कोरोनाबाधितांवर उपचार करताना आजारी पडलेल्या पतीच्या उपचाराचा मागितला खर्च

तात्या लांडगे

सोलापूर

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी गेलेले माझे डॉक्टर पती डॉ. संतोष गायकवाड हे आजारी पडले. त्यांच्यावर सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये 9 दिवस उपचार करण्यात आले. त्यासाठी दोन लाख 14 हजार रुपयांचा खर्च आला असून तो संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि आमचे पैसे परत मिळावेत, असे पत्र त्यांची गर्भवती पत्नी दिपाली गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांना लिहिले आहे.
कोरोनाच्या महामारी काळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने राज्य सरकारने अधिकारी व कर्मऱ्यांचा उत्पन्न कर मार्चमध्ये कपात करण्यात आला आहे. तर एप्रिल महिन्यातील पगारात 25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. महागाई भत्ता ही जुलै 2021 पर्यंत दिला जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मे महिन्याच्या पगारातून एक-दोन दिवसांचे वेतन परस्पर कापून घेतले जाणार आहे. तर 50 लाख रुपयांच्या विम्याची घोषणा होऊनही अद्याप आमच्याकडून कोणतीही माहिती तथा कागदपत्रे घेतलेली नाहीत. तर राज्यातील धोरणाचा विकास सोडून या विषाणूला हद्दपार करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून जिवाचे रान करणाऱ्या डॉक्टरांना दोन हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्याचेही सरकारने जाहीर केले होते. मात्र, त्याचीही कार्यवाही सुरू झालेली नाही. अशा परिस्थितीत आजारी पडलेल्या माझ्या पतींच्या उपचारासाठी दोन लाख 14 हजार रुपयांचा खर्च झाला. त्याची जुळवाजुळव करताना नातेवाईकांकडून उसनवारी करावी लागली. कुटुंबाचा उदरनिर्वाह व वैद्यकीय खर्च वाढल्याने सरकारने तो उपचाराचा झालेला खर्च द्यावा, अशी विनंती ती पत्रातून करण्यात आले आहे.

असा आहे पत्रातील मजकूर 

डॉ. संतोष केरबा गायकवाड हे सेवांतर्गत पदव्युत्तर पदविका कनिष्ठ निवासी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सोलापुरातील डॉ. वैश्यंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना ते आजारी पडले. त्यांना 20 एप्रिलला ताप आला आणि 27 एप्रिलपर्यंत प्रकृती खालावत असल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयात ऍडमिट केले. 29 एप्रिल रोजी त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, मात्र प्रकृती खालावल्याने 2 मे रोजी त्यांना सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 12 मे रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. उपचारासाठी दोन लाख 14 हजार रुपयांचा खर्च झाला असून तो खर्च शासनाकडून मिळावा.
- दिपाली गायकवाड, डॉक्टर पत्नी

संबंधित बातम्या