मासेमारी दरम्यान जाळ्यात अडकला डॉल्फिन!

डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडुन जीवदान दिले.
मासेमारी दरम्यान जाळ्यात अडकला डॉल्फिन!
Dolphin FishDainik Gomantak

मोचेमाड : मोचेमाड समुद्रात पारंपारिक पद्धतीने मासेमारी केली जाते. रापण या मासेमारी प्रकारात आज मासेमारी दरम्याण जाळ्यात तीन मोठे डॉल्फिन मासे (Dolphin fish) सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी या डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढून पुन्हा समुद्रात सोडुन जीवदान दिले. रापणीच्या जाळ्यात सापडलेल्या या डॉल्फिन माश्यांना पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यावर (The beach) गर्दी केली होती.

मालवणच्या चिवला बीचवर गेल्याच आठवड्यात असाच एक प्रकार घडुन आला होता. तेथील न्यू रापण संघ रेवतळे यांनी लावलेल्या रापणीत चक्क 8 ते 10 छोटे, मोठे डॉल्फीन सापडून आले. रापण संघाच्या सदस्यांनी त्या डॉल्फीन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडले होते. त्या पाठोपाठ आता मोचेमाडमध्येही (Mochemad Beach) असाच प्रकार घडला.

Dolphin Fish
82 'आयुष' डॉक्टरांना खूषखबर!

मोचेमाड येथील समुद्रात पारंपरिक 'रापण' पद्धतीची मासेमारी केली जाते. रोजच्याप्रमाणे श्री समर्थ रापण संघाच्या सदस्यांनी सकाळी समुद्रात रापणीची जाळी टाकली व ती बऱ्याच वेळाने किनाऱ्यावरती ओढली असता, त्यात चक्क तीन मोठे डॉल्फिन मासे असल्याचे दिसून आले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता अडकलेल्या तीनही डॉल्फिन माशांना जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले.

डॉल्फिन माशांना रापण संघातील सदस्य महादेव तांडेल, विपुल पवार, रमाकांत कोचरेकर, सागर कोचरेकर, जयेश तांडेल, नारायण आरावंदेकर, पियेश तांडेल, आनंद सातोस्कर, जगन्नाथ तांडेल, संतोष पवार, चिन्मय कुर्ले, साहिल कुबल या मच्छीमार बांधवांनी डॉल्फिन माशांना सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हिवाळ्यात हे डॉल्फिन मासे समुद्रात मोठ्या प्रमाणात दिसुन येतात. समुद्रात डुबक्या मारत हे डॉल्फिन थव्याने फिरत असतात. काही ठिकाणी तर हे डॉल्फिन दर्शन घेण्यासाठी पर्यटक होडीतुन समुद्रात फेरफटका मारतात; परंतु इथे तर चक्क डॉल्फिनच जाळ्यात सापडले असल्याने माश्यांना पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी झाली होती.

या दिवसात डॉल्फिनचे कळप प्रजनन क्रियेसाठी समुद्र किनाऱ्यालगत येतात किंवा एखाद्या माशांची शिकार करायची असल्यास ते आपल्या एक आवाजाची विशिष्ट खूण करून इतर डॉल्फिनना बोलावतात. त्यातील काही डॉल्फिन हे मागे चुकून राहिल्यास असे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकतात. हे मादी डॉल्फिन होते. ते मच्छिमार जाळ्यांना कोणतेही नुकसान करत नाहीत; मात्र यातील दुसऱ्या जातीचे डॉल्फिन जाळ्यात अडकल्यास ते जाळी तोडून बाहेर पडतात. त्यामुळे मच्छिमार जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com