कोविड साथीत परीक्षा नको

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

जीव अधिक महत्त्वाचा; विद्यार्थ्यांचा न्यायालयात युक्तिवाद

मुंबई

अंतिम वर्षाच्या परीक्षांना आमचा विरोध नसून कोविड 19 च्या साथीमध्ये परीक्षा घेण्यास विरोध आहे. हा प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या जीवन आणि आरोग्याचा आहे, असा युक्तिवाद आज याचिकादार विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. याबाबतची पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत यूजीसीने दिलेल्या निर्देशांविरोधात राज्यातील युवा सेनेसह विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. त्यावर आज न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शहा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. विद्यार्थ्यांच्या वतीने ऍड. अभिषेक मनू सिंघवी यांनी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरावरून आलेले असतात. परीक्षेसाठी त्यांचे शिक्षण होणे महत्त्वाचे असते; मात्र लॉकडाऊनमुळे शिक्षणच विस्कळित झाले असेल, तर परीक्षा कशा घेणार, असा युक्तिवाद ऍड. अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.
शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा नसून कोविडची साथ महत्त्वाची आहे. कोव्हिडची बाधा कोणालाही होऊ शकते. त्यामुळे हा जीवनाचा प्रश्‍न आहे, असेही ऍड. सिंघवी यांनी सांगितले.
यूजीसीने घेतलेला निर्णय मनमानी करणारा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित राज्यांमधील परिस्थिती राज्य सरकारकडून विचारात घ्यायला हवी होती, असा आरोपही सिंघवी यांनी केला. केंद्रीय गृहमंत्रालयाने शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे; तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार आणि यूजीसी परीक्षा घेण्याचा अट्टहास करत आहे. हा विरोधाभास असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडचा आता धोका अधिक
युवा सेनेच्या वतीने ऍड. शाम दिवाण यांनी बाजू मांडली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या हजारात होती तेव्हा यूजीसीने परीक्षांना परवानगी दिली नव्हती. आता रुग्णसंख्या लाखांच्या घरात पोहचल्यानंतर यूजीसीकडून सक्ती केली जात आहे, हा विरोधाभास आहे, असे डॉ. दिवाण यांनी सांगितले.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या