कोरोना संकटात गैरहजर सहा पोलिसांविरोधात गुन्हा

Dainik Gomantak
रविवार, 28 जून 2020

नोटिसा देऊनही कामावर येण्यास टाळाटाळ

मुंबई

कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली असून या काळात सर्व पोलिसांनी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश आहेत; पण त्यानंतरही गैरहजर राहिलेल्या बोरिवली पोलिस ठाण्यातील सहा पोलिसांविरोधात बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिसाचाही समावेश आहे.
बोरिवली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 145 आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005 कलम 56 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक पोलिस नाईक व पाच पोलिस शिपायांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिला पोलिस शिपायाचाही समावेश आहे.
पोलिस ठाण्याकडून नोटीस बजावूनही ते कर्तव्यावर हजर झाले नाही. त्यानंतर पोलिस उपायुक्त परिमंडळ 11 कार्यालयाकडूनही नोटीस बजावण्यात आली होती. त्याशिवाय तोंडी आदेशही देण्यात आले होते. त्यानंतरही ते कर्तव्यावर हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यातील एक महिला पोलिस कर्मचारी 2018 पासून कर्तव्यावर उपस्थित नव्हती. याशिवाय एक पोलिस शिपाई 3 जूनपासून विलगीकरणात होता. त्यानंतर 16 जूनपासून तोही कामावर हजर झाला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले; तर एक पोलिस शिपाई 31 मार्चपासून 10 जूनपर्यंत गैरहजर होता. त्यामुळे नोटीस पाठवून तसेच दूरध्वनी करूनही कर्तव्यावर गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात बोरिवली पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

याआधी एसआरपीएफच्या 17 जवानांवरदेखील गुन्हे
यापूर्वी अशा पद्धतीने विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) 17 जवानांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व राज्य राखीव पोलिस अधिनियमांतर्गत वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या