गणेशोत्सवानंतर ई-पास सक्ती रद्द

प्रशांत कांबळे
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

मुख्य सचिवांची माहिती; केंद्रीय गृहविभागाचे महाराष्ट्राला पत्र

केंद्र सरकारने नुकतेच अनलॉक-३ अंतर्गत महाराष्ट्र सरकारला राज्यांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटविण्याची विनंती केली आहे. शिवाय यासाठी लागणारी परवानगी, ई-पास सक्तीही रद्द करावी, असे सांगितले आहे; मात्र अद्याप महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतर महाराष्ट्रातील ई-पास सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली.

महाराष्ट्रातील पाच महिन्यांच्या लॉकडाउननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या अनलॉक टप्पा-३ सुरू आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील निर्बंध हटविणे आवश्‍यक आहे; मात्र देशातील अनेक राज्यांनी प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीवरील राज्यांतर्गत आणि आंतरराज्यातील निर्बंध हटविले नाहीत. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीही नागरिकांना ई-पास काढावा लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागतो. दरम्यान, महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने ई-पास अट रद्द करून एसटीची सेवा सुरू केली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूकही सुरू केल्याचे राज्य सरकार सांगत असले तरी राज्यातील खासगी वाहतुकीला मात्र ई-पास सक्ती कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. 

केंद्राच्या पत्रावर महाराष्ट्र गृहमंत्र्यांचे ट्‌विट
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रानंतर महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतली आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे ट्‌विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या