नोकरीसाठी गोव्यात जाणाऱ्यांना प्रशासन देणार ई-पास 

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

सावंतवाडी तहसीलदारांची माहिती; नोंदणीचे आवाहन, कोरोना तपासणीनंतर रवानगी

सावंतवाडी

गोव्यात कामाला असलेल्या जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी जिल्हा प्रशासन एकत्ररीत्या ई-पासची व्यवस्था करणार आहे. त्याआधी संबंधितांनी तालुक्‍याच्या तहसील कार्यालयात आपल्या नावाची नोंद करायची आहे. ही नोंद झाल्यानंतर सर्वांची कोविड तपासणी करून ती निगेटिव्ह आल्यानंतर गोवा सरकारशी चर्चा करून त्यांना गोव्यात पाठविण्यात येणार असल्याची माहिती येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आज दिली.
या भागाचे आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात दखल घेताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. यातून जिल्ह्यात अडकलेल्या तरुण-तरुणींना गोव्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी काहीशा दूर झाल्या; मात्र गोव्यात जायचे झाल्यास गोवा शासनाचा ई-पास आवश्‍यक होता; पण हा ई-पास उपलब्ध होत नसल्याने एक नवी समस्या तरुणांसमोर उभी होती. याची दखल पुन्हा एकदा आमदार केसरकर यांनी घेऊन जिल्हा प्रशासन, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री सावंत त्यांचे लक्ष वेधले. जिल्हा प्रशासनाने गोव्यात कामाला असलेल्या युवक-युवतींची नोंद तहसील कार्यालयाच्या ठिकाणी घेण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिले.
जिल्हा प्रशासनाने गोवा प्रशासनाची चर्चा केली. त्यानुसार याठिकाणी गोव्यात जाणाऱ्या सर्वांची कोविड तपासणी जिल्हा प्रशासनाकडून करण्याचे निश्‍चित झाले. त्यामुळे गोव्यामध्ये गेल्यावर इथल्या तरुणांना दोन हजार रुपये खर्च आता करावा लागणार नाही.
याबाबत तहसीलदार म्हात्रे म्हणाले, ""गोव्यामध्ये ज्यांची राहण्याची व्यवस्था आहे, त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आपली नोंद करायची आहे. तहसील कार्यालयामध्ये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, नोंद झाल्यानंतर चार दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वांचे कोविड तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर संबंधितांचे एकत्रित ई-पास काढून त्यांना गोव्यामध्ये पाठवण्यात येणार आहे. गावागावांतील सरपंचांनी आपल्या भागातील गोव्यातील तरुणांना याबाबत कल्पना देताना त्यांची नोंद येथील तहसील कार्यालयामध्ये करावी.''

संबंधित बातम्या