भरमसाट देयकांनी वीजग्राहक हैराण

electricity bills
electricity bills

मुंबई

अदानी आणि महावितरण या वीज कंपन्यांनी ग्राहकांना जूनची भरमसाट देयके पाठवली आहेत. जूनची वीजदेयके पाहून धक्का बसलेल्या नागरिकांची महावितरण कार्यालयात गर्दी उसळली आहे; परंतु अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप वीजग्राहक करत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे धास्तावलेल्या सामान्य नागरिकांच्या समस्यांमध्ये जूनचे वीजदेयक पाहून आणखी भर पडली आहे. दरमहा 500 ते हजार रुपयांचा वीजवापर असणाऱ्या मुंबईतील ग्राहकांना 2000 ते 40 हजार रुपयांची देयके आल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. वापरात नसलेले घर आणि दुकानाचे हजारो रुपयांचे वीजदेयक आल्यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहक रक्कम कमी करण्याची मागणी करत आहेत. मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्‍ट्रिसिटी कंपनीनेही अवाजवी देयके पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.
महावितरणने गेल्या तीन महिन्यांची एकत्रित वीजदेयके ग्राहकांना पाठवली आहेत. या देयकांमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी ग्राहक कार्यालयांत गर्दी करू लागले आहेत. दरम्यान, महावितरणने ग्राहकांना पाठवलेली देयके अचूक असल्याचा दावा केला आहे. खारघर येथील स्वप्नपूर्ती संकुलातील आनंद पुकले यांना मे महिन्यात 1570 रुपयांचे वीजदेयक आले होते; मात्र जूनमध्ये त्यांना तब्बल 4110 रुपयांचे देयक मिळाले. ते खांदा कॉलनी येथील वीज भरणा कार्यालयात गेले असता, अधिकाऱ्यांनी वीजदेयके अचूक असल्याचे सांगितले. वीजमीटर खराब असल्याचे वाटत असल्यास 234 रुपये भरून तपासणी करून घ्या, असे सांगण्यात आल्याची माहिती पुकले यांनी दिली.


वीजबिल माफीसाठी जनचळवळ
वीज कंपन्यांनी नफा मिळवण्यासाठी दहापट रकमेची देयके पाठवली आहेत. अदानी इलेक्‍ट्रिसिटीसारख्या कंपन्यांनी वेगवेगळे हिशेब दाखवून ग्राहकांचे कंबरडे मोडेल अशी देयके पाठवायला सुरुवात केली आहे, असा आरोप मुंबई वॉचडॉग फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी नायर यांनी केला. या कंपन्यांनी वीजदेयकांची आकारणी करू नये, यासाठी जनचळवळ सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांना पाठवलेली बिले अचूक आहेत. मे महिन्यात विजेचा वापर अधिक झाल्याने ही बिले आली आहेत. ग्राहकांच्या तक्रारीची दखल नक्कीच घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया अदानी इलेक्‍ट्रिसिटी कंपनीच्या प्रवक्‍त्याने दिली.

अभिनेत्रीला 38 हजारांचे बिल
"गेल्या महिन्यात मी असे कोणते विजेचे उपकरण घरात बसवले, की माझे बिल एवढे वाढले' असे ट्‌विट करत अभिनेत्री तापसी पन्नू हिने अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबईला टॅग केले आहे. राहत्या घराचे वीजबिल 36 हजार आले असून, कोणीही राहत नसलेल्या एका घराचे देयक 3850 रुपये आले आहे, असे तिने म्हटले आहे.


महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक पाठवण्यात आली आहे. या लिंकवर वीजदेयकाची माहिती, स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करता येईल.
- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com