रेल्वेस्थानकांबाहेर कर्मचाऱ्यांची गर्दी

Dainik Gomantak
बुधवार, 17 जून 2020

सोशल डिस्टन्सिंग पायदळी; थर्मल स्क्रीनिंगसाठी रांगा

मुंबई

रेल्वे मंत्रालयाने फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी लोकलमध्ये नगण्य प्रवासी होते; मात्र मंगळवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पुरते कोलमडले होते. 
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी आणि बेस्ट बसमधून प्रवास करावा लागत होता. विशेष लोकल सुरू झाल्याची माहिती या कर्मचाऱ्यांना न मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी गाड्या जवळपास रिकाम्याच धावल्या. मंगळवारी मात्र तिन्ही मार्गांवरील रेल्वेस्थानकांत अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर या कर्मचाऱ्यांची थर्मल तपासणी केली जात असून, ओळखपत्र तपासले जात आहे. हीच पद्धत लोकलना थांबा असलेल्या सर्व स्थानकांवर अवलंबली जात असल्याने मंगळवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांना ऐन घरी जाण्याच्या वेळेत रांगा लावाव्या लागल्या. परिणामी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासला गेल्याचे दृश्‍य बहुतेक स्थानकांवर दिसले. 

मध्यरात्री घोषणेचा रेल्वेला फटका
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 15 जूनपासून लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली. त्यानंतरच्या निर्णयाबाबत कर्मचारी आणि पत्रकारांना उत्सुकता होती; परंतु रेल्वे प्रशासनाने याबाबतची घोषणा रात्री 11.30 वाजेपर्यंत केलीच नाही. त्यामुळे लोकल सेवेचा निर्णय अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने पहिल्या दिवशी, सोमवारी गाड्यांमध्ये तुरळक प्रवासी होते.

छायाचित्रे, व्हिडीओ व्हायरल
अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची रेल्वेस्थानकांवर गर्दी झाली होती. सकाळी आणि सायंकाळी उसळलेल्या गर्दीची छायाचित्रे व व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. 

मंगळवारी दिवसभरात
मध्य रेल्वे : 200 लोकल, 35 हजार प्रवासी.
हार्बर मार्ग : रात्री 8 वाजेपर्यंत 25 हजार प्रवासी.
पश्‍चिम रेल्वे : 162 लोकल, 35 हजार प्रवासी.

पश्‍चिम रेल्वेवरील प्रत्येक लोकलमधून 700 व्यक्तींनाच प्रवास करता येतो. सध्या 400 नागरिक प्रवास करत असून, कुठेही गर्दी झाली नव्हती. कोव्हिड-19 संदर्भातील नियमांचे पालन केले जात आहे. समाज माध्यमांवर जुने व्हिडीओ व्हायरल करून पश्‍चिम रेल्वेला बदनाम केले जात आहे. 
- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्‍चिम रेल्वे.

सोशल डिस्टन्सिंग आणि कोव्हिडचे नियम पाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सीएसएमटी येथे रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर आहेत. प्रवाशांची गर्दी होऊन अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या. प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले. नियमांचे उल्लंघन कुठेही झाले नाही.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

संबंधित बातम्या