चकमेक फेम सचिन वाझे पुन्हा सेवेत

Dainik Gomantak
रविवार, 7 जून 2020

18 पोलिसांचे निलंबन मागे; 95 पोलिसांचे निलंबन कायम

मुंबई

घाटकोपर स्फोटांमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूस याच्या मृत्यूप्रकरणी निलंबित झालेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. वाझे यांच्यासह 18 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामील करण्यात आले आहे. त्यांच्यात ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झालेल्या चार पोलिसांचा समावेश आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या पुनर्विलोकन बैठकीत 113 पोलिसांच्या निलंबनावर चर्चा झाली. त्यापैकी 95 पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आलेले नाही. त्यांतील तीन पोलिसांचे निलंबन पोलिस संचालक कार्यालयामार्फत करण्यात आले होते. निलंबनाच्या प्रकरणांची पडताळणी करण्यात आली व शक्‍य आहे त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. दरम्यान, निलंबन मागे घेण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमी महत्त्वाच्या विभागांत बदली करण्यात आली आहे. चकमक फेम वाझे यांची सशस्त्र पोलिस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. 
पोलिस दलात 1990 मध्ये दाखल झालेले वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातून सेवेची सुरुवात करणारे वाझे ठाणे पोलिस दलातील कामगिरीमुळे प्रसिद्धीला आले. घाटकोपर येथे 2002 मध्ये झालेल्या स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनूस याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणी वाझे यांच्यासह 14 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ठोस पुरावे न मिळाल्यामुळे वाझे यांच्यासह आणखी तीन पोलिसांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. 

मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल
मुंबई पोलिस दलातील मनुष्यबळ आधीच कमी असून, निलंबित पोलिस घरबसल्या 75 टक्के पगार घेतात. म्हणून त्यांना सेवेत घेऊन कमी महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटेल व त्यांच्या चौकशीवरही परिणाम होणार नाही, असा पर्याय निवडण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या