माथेरानवासीयांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा

Dainik Gomantak
रविवार, 17 मे 2020

आठवड्यातून तीन दिवस वाहनांना परवानगी

मुंबई

लॉकडाऊनमध्ये माथेरानमधील 30 हजारांहून अधिक नागरिकांना शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस वाहन सेवा सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सुरक्षा नियम पाळून वाहतूक सेवा चालवावी, असे न्या. शाहरूख काथावाला यांनी स्पष्ट केले.
माथेरान या निसर्गरम्य गिरिस्थानाचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात (इको-सेन्सिटिव्ह झोन) समावेश आहे. अनेक वर्षांपासून तेथील दस्तुरी पॉइंटपुढे वाहनांवर प्रतिबंध आहेत. केवळ सफाई वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंसाठी अधिक खर्च करून गॅस सिलिंडर, धान्य, भाजीपाला घोडागाडीतून आणावा लागत आहे. लहान वाहन अथवा टेम्पोतून जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरू केल्यास माथेरानवासीयांना दिलासा मिळेल, अशी याचिका माजी आमदार सुरेश लाड यांनी केली आहे. लॉकडाऊनमध्येही वाहतुकीवर निर्बंध असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
या याचिकेसंदर्भात पर्यावरणाचा समतोल साधून वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करता येतील का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण विभाग आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. पर्यावरण मंत्रालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने बैठक घेऊन निर्णय घेतला आणि शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाला माहिती दिली. लॉकडाऊनमुळे माथेरानचे पर्यटन तोट्यात आहे; त्यामुळे अर्थकारण कोसळले आहे. अशा परिस्थितीत रहिवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे जीवनावश्‍यक सेवांसाठी वाहतूक सुरू करणे आवश्‍यक आहे, असा निर्णय घेण्यात आला. सामानाच्या वाहतुकीबात रेल्वेलाही सूचना देण्यात आल्या आहेत. आठवड्यातील तीन दिवस जीवनावश्‍यक वस्तूंचा वाहनातून पुरवठा केला जाईल.

संबंधित बातम्या