मुलीच्या हत्येप्रकरणी वडिलांना जामीन मंजूर

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

मुलीच्या हत्येच्या आरोपावरून वडील राजकुमार चौरसिया पोलिस कोठडीत आहेत.

मुंबई

स्वतःच्या मनाविरुद्ध मुलीने लग्न केल्यामुळे तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या वडिलांना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. गेल्या वर्षी 15 जुलै रोजी घाटकोपरमध्ये पदपथावर तरुणीचा मृतदेह आढळला होता. तेव्हापासून मुलीच्या हत्येच्या आरोपावरून वडील राजकुमार चौरसिया पोलिस कोठडीत आहेत.
मुलीने स्वतःच्या आवडीने आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते; मात्र ती गावी आल्यास गावात अप्रतिष्ठा होईल, अशी भीती वडिलांना होती. त्यामुळे त्यांनी मुलीला फोनवरून बोलवून घेतले आणि तिची कोयत्याने वार करून हत्या केली. त्यानंतर दोन दिवसांनी मुलीचा मृतदेह मिळाला, असे पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. आरोपीने जामीन मिळण्यासाठी ऍड. गणेश गुप्ता यांच्यामार्फत अर्ज केला होता.
न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामीन अर्जांवर नुकतीच सुनावणी झाली. मुलीचे आणि वडिलांचे संबंध प्रेमाचे होते. पोलिसांनी दाखल केलेले पुरावे सक्षम नाहीत, असा युक्तिवाद गुप्ता यांनी केला. वडील मुलीशी फोनवर बोलू शकतात. तसेच मोबाईल लोकेशनवरून हत्येच्या दिवशी ते घाटकोपरमध्ये नव्हते, असा युक्तिवाद करण्यात आला. सरकारच्या वतीने कोयता विक्रेता, फोन कॉल्स आदी पुरावे सादर करण्यात आले; मात्र हे सर्व घटनात्मक पुरावे आहेत. पोलिसांकडे प्रत्यक्षदर्शी आणि थेट पुरावे नाहीत, असा बचाव आरोपीच्या वतीने करण्यात आला. तो मान्य करत आरोपीला पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सशर्त जामीन न्यायालयाने मंजूर केला.

संबंधित बातम्या