आधी आठ लाख हडपले अन् नंतर एसटी चालकाचे मुंडकेच छाटले!

अवित बगळे
मंगळवार, 14 जुलै 2020

पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, लिपिकासह दोघांना ठोकल्या बेड्या

औरंगाबाद

एसटी महामंडळातून चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या बसचालकाची लिपिकाने खोटी स्वाक्षरी करून भविष्य निर्वाह निधीची आठ लाखांची रक्कम हडप केली. त्यानंतर प्रकार उघड झाल्याने वृद्ध चालकाचे शिर धडावेगळे करून निर्घृण खून केला. सोलापूर-धुळे महामार्गाजवळील एका विहिरीतून सोमवारी (ता. तेरा) सिमेंटच्या पोत्यात बांधलेले धड आणि झाल्टा फाट्यावरून शिर हस्तगत करण्यात आले. या प्रकरणात लिपिक अतिक अमीर काझी (३५, रा. एसटी कॉलनी, कटकट गेट) आणि अफरोज खान जलील खान (३५, रा. सातारा परिसर) यांना पोलिसांनी अटक केली.
एसटीतील चालक मुजीब अहमद खान आबेद रशीद खान (५९, रा. शहानगर, बीड बायपास) हे चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. मुजीब खान यांची निवृत्ती आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. ता. ९ जुलै रोजी मुजीब खान हे दुपारी विभाग नियंत्रक कार्यालयात गेले होते. त्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुजीब खान यांचा मुलगा रशीद खान याने क्रांती चौक पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. नातेवाइकांनी लिपिक अतिक काझी याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यावरून त्याची दोन दिवसांपासून कसून चौकशी सुरू होती.

रक्कम हडपली
बसचालक मुजीब खान हे डिसेंबर १९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीची रक्कम काढण्यासाठी त्यांनी विभागीय कार्यालयातील लिपिक अतिक काझी याच्याकडे कोऱ्या चेकवर स्वाक्षरी करून दिले होते. त्यानंतर मुजीब खान हे धार्मिक कार्यासाठी बाहेरगावी निघून गेले. तेथून परतल्यानंतर लगेचच त्यांनी काझीकडे पैशाची मागणी केली. मात्र, तोपर्यंत अतिक काझीने बनावट स्वाक्षरीच्या आधारे स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँकेतून मुजीब खान यांच्या खात्यावरील निवृत्तीची आठ लाखांची रक्कम परस्पर काढली. हे प्रकरण समजल्याने मुजीब खान यांनी अतिक काझीकडे पैशासाठी तगादा लावत पोलिसांत फसवणुकीची तक्रार देण्याचे धमकावले होते.

अपहरण, खून
ता. ९ जुलै रोजी दुपारी मुजीब खान यांनी अतिक काझीला विभागीय कार्यालयात गाठले. त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने मुजीब खान यांना कारमध्ये बसवून देवळाई येथील नातेवाइकाकडे रक्कम आणण्यासाठी जायचे असे म्हणत सोबत नेले. यावेळी मुजीब खान यांनी पत्नीशी संपर्क साधून तिला काझीसोबत कारने जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काझीने वर्गमित्र असलेल्या अफरोज खानच्या घरी नेले. त्यानंतर त्यांचे तोंड दाबून पाठीमागून लोखंडी रॉडने वार केला. मुजीब खान हे बेशुद्ध होताच तीक्ष्ण हत्याराने त्यांचे शिर कापून धडावेगळे केले.

शीर इकडे अन् धड फेकले तिकडे
हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी अतिक काझी आणि अफरोज खान यांनी सिमेंटच्या रिकाम्या गोणीत मृत मुजीब खान यांचे धड टाकून त्यावर सिमेंट आणि दगड टाकले. त्यानंतर शिरदेखील एका सिमेंटच्या गोणीत भरून कारने सोलापूर-धुळे महामार्गाजवळील एका विहिरीत धड टाकले, तर शिर असलेली गोणी झाल्टा फाट्याजवळील एका पडक्या खोलीजवळील झाडाझुडपात फेकली. त्यापूर्वी मुजीब खान यांचा मोबाईल व त्यातील सिमकार्ड सातारा परिसरात एका ठिकाणी फेकून दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघेही तेथून परतले.

पोलिसांनी लावला छडा
मुजीब खान यांच्या नातेवाइकांनी अतिक काझीवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहायक फौजदार नसीम पठाण, जमादार सलीम सय्यद, पोलिस नाईक राजेश फिरंगे, शिपाई मनोज चव्हाण, मिलिंद भंडारे, संतोष रेड्डी, दयानंद मरसाळे यांच्या पथकाने रविवारी विभागीय कार्यालयातील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात मुजीब खान हे सायकल उभी करून कार्यालयात जाताना दिसले. तसेच अतिक काझीदेखील त्यानंतर बाहेर पडताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अतिक काझीच्या कारची तपासणी करण्यासाठी रविवारीच बीड बायपासवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्याची कार ये-जा करताना सीसीटीव्हीत दिसली. त्यानंतर अतिक काझीला खाक्या दाखवण्यात आला. त्याने रात्री खुनाची कबुली दिल्यानंतर सोमवारी (ता. तेरा) सकाळी अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात रशीद खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

लॉकडाउनच्या काळात सात खून
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना शहरात तीन महिन्यांच्या काळात सहा घटनांमध्ये सातजणांचा खून झाला आहे. किलोभर सोन्यासाठी सातारा परिसरात बहीण-भावाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी नकोशा बालकाचा राजाबाजारात खून झाला होता, तर त्यानंतर वाळूज औद्योगिक वसाहतीत एकापाठोपाठ तिघांची हत्या झाली आहे. त्यापाठोपाठ एसटी चालकाचा खून झाला.

संबंधित बातम्या