मुंबईतून साडेपाच लाख परप्रांतीय रवाना;

Dainik Gomantak
बुधवार, 27 मे 2020

आणखी दोन लाख मजूर प्रतीक्षेत

मुंबई

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेले साडेपाच लाख परप्रांतीय आतापर्यंत मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. मुंबई पोलिसांकडे अद्याप दोन लाख अर्ज प्रलंबित आहेत.
मुंबई पोलिसांकडे साडेसात लाख परप्रांतीय कामगारांनी मूळ राज्यांत परत जाण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी चार लाखांहून अधिक कामगारांना श्रमिक रेल्वेगाड्यांमधून रवाना करण्यात आले; तर दीड लाख व्यक्तींना एसटी बसद्वारे पाठवण्यात आले. राज्यभरातून आणखी तीन लाख परप्रांतीय मजूर गावी जाण्याच्या प्रतीक्षेत असून, त्यासाठी 100 हून अधिक श्रमिक रेल्वेगाड्या आवश्‍यक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील परप्रांतीय कामगारांना मूळ राज्यांत पाठवण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली, त्यानुसार 2 मेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर 4 मे रोजी पहिली बस मुंबईतून राजस्थानला रवाना झाली. प्रतीक्षा यादी व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या अडचणीमुळे या प्रक्रियेला पाहिजे तशी गती मिळत नव्हती. त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी पायीच गाव गाठण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद येथे रेल्वे अपघातात अशा 16 मजुरांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (अध्यक्ष), सहपोलिस आयुक्त विनय चौबे व उपसचिव राहुल कुलकर्णी (सदस्य) यांची समिती नेमण्यात आली असून, त्यांच्या मदतीसाठी 1421 मंत्रालयीन कर्मचारी देण्यात आले आहेत. ही समिती परराज्यांत जाणाऱ्या व्यक्तींचे नियोजन करेल. त्यासाठी नॅशनल मायग्रंट्‌स इन्फॉर्मेशन सिस्टमचा (एनएमआयएस) वापर केला जाणार आहे.

संबंधित बातम्या