महाडमध्ये पाच माजली इमारत कोसळली, २५ जणांना वाचवण्यात यश

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

घटनेबाबत माहिती कळताच महाड नगरपालिका, पोलिस यंत्रणा तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मदतीसाठी पुण्यातूनही एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले.

महाड: येथील  काजळपुरा भागातील ‘तारिक गार्डन’ ही पाच मजली निवासी इमारत कोसळल्याने सुमारे ७० ते ८० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, रात्री ९ वाजेपर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले. ढिगारा हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) मदतीसाठी पाचारण केले आहे.

या इमारतीत ‘ए’ आणि ‘बी अशा दोन इमारती असून त्यात ४५ सदनिका आहेत. सुमारे २०० ते २५० नागरिक येथे राहत होते. ही सर्व मुस्लिम कुटुंबे  आहेत. त्यांच्यापैकी सुमारे ७० ते ८० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. 

घटनेबाबत माहिती कळताच महाड नगरपालिका, पोलिस यंत्रणा तसेच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मदतीसाठी पुण्यातूनही एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. इमारत कोसळल्याचा मोठा आवाज आल्याने सुरवातीला परिसरातील लोक हादरून गेले. त्यानंतर धूर झाल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी त्यांना इमारत कोसळून सिमेंट, माती आणि लाकडाच्या सामानाचा प्रचंड ढिगारा दिसला. अनेक लोकांचा आक्रोश आणि विव्हळण्याचा ढिगाऱ्याखालून आवाज आल्याने स्थानिकांनी तात्काळ मदतकार्यास सुरुवात केली. महाडमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बचावकार्य करणे शक्य झाले, मात्र अंधार पडला असल्याने त्यात अडथळे येत होते.

स्लॅब एकमेकांवर आदळले
इमारतीचे सर्व स्लॅब एकमेकांवर समांतर आदळले आहेत. सर्व भिंतीचा चुराडा झाला आहे. इमारतीचे हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. या घटनेत जखमी झालेल्या १२ जणांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चार पोकलेन, चार जेसीबीच्या सहाय्याने ढिगारे हटविण्याचा प्रयत्न सुरू होता. 

ढिगाऱ्याखालून मदतीसाठी हाक
महाड दुर्घटनास्थळी रात्री १० वाजता जिल्हाधिकारी निधी चौधरी पोहचल्या. त्यांनी यंत्राद्वारे होणारे मदत कार्य थांबवून बचाव कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. इमारतीखाली अडकलेले रहिवाशी मोबाईलद्वारे संपर्क साधून मदत करण्याची विनंती करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला.

आठ वर्षांपूर्वीची इमारत
इमारतीत एकूण ४८ ते ५० कुटुंबे होती. एकूण २०० ते २२५ लोक या इमारतीत राहत असल्याने इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १५० पेक्षा जास्त लोक अडकल्याची शक्यता आहे. ही इमारत ७ ते ८ वर्षांपूर्वीच बांधलेली होती. इमारतीचे वरचे तीन मजले आधी कोसळले. त्यानंतर पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या