सिंधुदुर्गात पूरस्थिती चिघळली

अवित बगळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

तिसऱ्या दिवशीही संततधार; प्रमुख नद्या धोका पातळीजवळ

ओरोस

सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या संततधारेमुळे आज पूरस्थिती आणखी गंभीर झाली. तिलारी, कर्ली आणि वाघोटन नदीने धोक्‍याची पातळी गाठण्यास सुरुवात केली. काठवरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे घरावर किंवा मांगरावर कोसळून लाखोंचे नुकसान झाले. गगनबावडा घाट वाहतुकीस बंद केला आहे. पुरात अडकल्याने कुडाळ लक्ष्मीवाडी येथील दहाजणांना स्थलांतरित करावे लागले.
आज अनेक भागात पुराचे पाणी घुसले. पुलांवर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. कुडाळ तालुक्‍यात महामार्ग बांधकामामुळे पाणी अडल्याने अनेक घरांना पुराचा वेढा पडला. तिलारी नदीच्या पाण्याने इशारा पातळी गाठली. कुडाळ तालुक्‍यातील कर्ली नदीच्या पाण्याची पातळी दहा मीटर झाली. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर इतकी असून धोका पातळी 10.91 मीटर आहे. कणकवली तालुक्‍यातील वाघोटन नदीच्या पाण्याची पातळी 7 मीटर असून इशारा पातळी 8.5 मीटर तर धोका पातळी 10.5 मीटर आहे. त्यामुळे तिन्ही काठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
वैभववाडी तालुक्‍यातील लोरे सुतारवाडी मधील कृष्णा चव्हाण यांच्या घरावर फांदी पडून नऊ हजारांचे तर मांगवलीतील यशवंत भालेकर यांच्या घराचे 15 हजारांचे नुकसान झाले. कुडाळ लक्ष्मीवाडीतील पुरात अडकलेल्या दहाजणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. देवगड तालुक्‍यातील वाडा येथे श्रीमती आरती आंबेरकर यांच्या घरावर माड पडून नुकसान झाले. वेंगुर्ले तालुक्‍यातील पेंडूर येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 13 घरांचे अंशतः नुकसान झाले. मालवण तालुक्‍यातील देवबाग येथील रहिवासी विजय मेतर यांच्या घरावर माड पडला. गगनबावडा रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करण्यात आले. कुडाळ तालुक्‍यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. मालवण तालुक्‍यातील वायंगणी येथे प्रमोद पेडणेकर यांच्या गोठ्यावर आंब्याचे झाड पडून पाच जनावरे जखमी झाली. वेंगुर्ले तालुक्‍यातील केळूस व होडावडा पुलावर पाणी आलेले असून वाहतूक बंद आहे. आरवली येथील सुरेश गोडकर यांच्या घरावर झाड पडले. सावंतवाडी तालुक्‍यातील बांदा बाजार येथे तर कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण बाजारपेठेत पाणी घुसले. वैभववाडी तालुक्‍यातील उंब कुंभारवाड़ी येथे संजय बंदरकर यांच्या घरावरील पत्रे पावसाने फुटले.

दोडामार्ग, वैभववाडीत पावसाचे द्विशतक पार
गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्‍यात 279 तर वैभववाडी तालुक्‍यात 237 मिलिमीटर इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद झाली. चार तालुक्‍यात शतक पार केले. तालुकावार पाऊस व आतापर्यंतचा पाऊस मिलीमीटरमध्ये असा ः दोडामार्ग 279 (2893), सावंतवाडी 110 (3134), वेंगुर्ले 115.2 (2938.8), कुडाळ 175 (2850.55), मालवण 121 (3894), कणकवली 79 (2638), देवगड 95 (2699), वैभववाडी 237 (2648).

संबंधित बातम्या