कणकवलीत उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला

kankavli mishap
kankavli mishap

कणकवली

शहरात महामार्ग चौपदरीकरणांतर्गत उभारणी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या दोन पिलरमधील स्लॅब आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कोसळला. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर शहरातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी घटनास्थळी येऊन तीव्र संताप व्यक्‍त केला. उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याने महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा पुन्हा समोर आला.
जुलैत शहरातील एस. एम. हायस्कूल परिसरात उड्डाणपुलाची जोड भिंत दोन वेळा कोसळली होती. त्यानंतर आज उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याने कणकवलीकरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पूल कोसळल्याच्या घटनेनंतर काही वेळातच कणकवलीतील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठी गर्दी केली. ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी तहसील कार्यालयात ठाण मांडले होते. याप्रकरणी महामार्ग अधिकारी, महामार्ग ठेकेदार यांची संयुक्‍त बैठक बोलावून पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली.
कणकवलीत गडनदी ते एस. एम. हायस्कूल परिसरात 44 पिलर उभे करून त्यावर उड्डाणपूल बांधणीचे काम सुरू आहे. यातील 26 पिलरवर बॉक्‍स गर्डर आणि स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पिलरवर बॉक्‍स गर्डर आणि स्लॅब टाकण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा सुरू झाले आहे. गेले दोन दिवस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उबाळे मेडिकल या दरम्यानच्या दोन पिलर दरम्यान बॉक्‍स गर्डरवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
आज सकाळी पावसाची उसंत घेतल्याने स्लॅब टाकण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले; मात्र सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अचानकपणे स्लॅबला सर्पोट देणारे लोखंडी खांब कोसळण्यास सुरवात झाली. त्यानंतर मोठा आवाज होत दोन पिलरमधील पंधरा मीटरचा स्लॅब खाली कोसळला. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र काही पादचारी तेथून जात असताना स्लॅब कोसळला यात ते सुदैवाने बचावले. मोठा आवाज येताच या पादचाऱ्यांनी तेथून पळ काढला.
उड्डाण पुलाचा स्लॅब कोसळल्याचे समजताच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, संतोष कानडे, मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, नगरसेवक संजय कामतेकर, मेघा गांगण, बंडू गांगण, नगरसेवक बंडू हर्णे, अबिद नाईक, रूपेश नार्वेकर, भाई परब, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, बाळू मेस्त्री, अशोक करंबेळकर, संजय मालंडकर, अनिस नाईक, राजन परब, दत्ताराम बिडवाडकर, संतोष कुडाळकर, योगेश मुंज, स्वप्नील चिंदरकर, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, प्रदीप मांजरेकर, सुजित जाधव यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याखेरीज कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सहायक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्यासह घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. कोसळलेल्या स्लॅबचा रस्त्यावरील भाग बाजूला करून पोलिस बंदोबस्तात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली.
स्लॅब कोसळल्यानंतर महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी त्याचप्रमाणे ठेकेदाराचे अधिकारी दाखल न झाल्याने नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला होता. त्यामुळे यावर मार्ग काय काढायचा, याबाबत निश्‍चित माहिती मिळत नसल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह कणकवलीवासियांनी तहसीलदार आर. जे. पवार यांची भेट घेतली. या वेळी तहसीलदारांनी महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदार यांची संयुक्‍त बैठक घेऊन याप्रश्‍नी तोडगा काढा, असे नगराध्यक्ष नलावडे तसेच आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्यानंतर सायंकाळी महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि ठेकेदार यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय उपस्थित लोकप्रतिनिधी आणि शहरवासीयांनी घेतला.

महामार्ग ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि दर्जाहीन काम यामुळे स्लॅब कोसळण्यासारख्या घटना घडत आहेत. महामार्ग अधिकाऱ्यांचे चौपदरीकरण कामावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे महामार्ग ठेकेदाराने कणकवलीकरांच्या भावनांशी खेळ सुरू केला आहे. महामार्गावरून जाताना आज प्रत्येकजण भीतीच्या छायेखाली आहे.
- समीर नलावडे, नगराध्यक्ष, कणकवली

संपादन - अवित बगळे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com