उड्डाणपूल जोडरस्त्याची भिंत कोसळली

Avit Bagle
मंगळवार, 14 जुलै 2020

कणकवलीतील घटनेने खळबळ; चौपदरीकरणाच्या कामाबाबत आरोप

कणकवली

शहरातील महामार्गावरील उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीचा काही भाग आज दुपारी दोनच्या दरम्यान कोसळला. सुदैवाने त्यावेळी वाहन जात नसल्याने अनर्थ टळला. यानंतर येथील सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. संरक्षक भिंत कोसळल्याने महामार्ग चौपदरीकरणाच्या दर्जाबाबत होत असलेले आरोप पुन्हा चर्चेत आले आहेत.

महामार्ग चौपदरीकरणाच्या शहरातील कामाबाबत कणकवलीकरांनी वारंवार आवाज उठवला होता. त्या पार्श्‍वभूमीवर उड्डाणपूल जोडणारी भिंत कोसळल्याने कणकवलीकरांचा संताप अनावर झाला. आम्ही कणकवलीकर संस्थेचे अध्यक्ष अशोक करंबेळकर यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
शहरात एस. एम. हायस्कूल ते नरडवे तिठा असा 1.2 किलोमीटरचा उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाला जोडण्यासाठी जानवली नदी पूल ते एस. एम. हायस्कूलपर्यंत सिमेंट बॉक्‍स रचून मातीचा भराव टाकला आहे. याचे काम मेमध्ये काम पूर्ण झाले. जूनपासून कोसळणाऱ्या पावसात या जोडरस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले होते. अनेक ठिकाणी सिमेंटचे बॉक्‍स बाहेर आले होते.
आज दुपारी दोनच्या सुमारास एस. एम. हायस्कूल समोरील उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याचे सिमेंट बॉक्‍स लगतच्या सेवा रस्त्यावर कोसळले. त्यानंतर मातीचा ढिगारा देखील रस्त्यावर आला. हा प्रकार होत असताना तेथून काही पादचारी जात होते. संरक्षक भिंत कोसळत असल्याचे पाहून ते सर्वजण सुरक्षित ठिकाणी गेले. यानंतर स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी धाव घेऊन या सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद केली.
शहरात यापूर्वी चौपदरीकरणाच्या दर्जाबाबत आरोप झाले आहेत. त्यानंतर यंदा मेमध्ये पूर्ण झालेल्या उड्डाणपूल जोड रस्त्याचेही काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्याअनुषंगाने 16 जूनला प्रांतांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम जेथे धोकादायक आहे, तेथे सिमेंटची संरक्षक भिंत बांधण्याचे निश्‍चित झाले होते. त्यानुसार जेथे संरक्षक भिंतीला तडे गेले तेथे सिमेंटची नवीन भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे; मात्र आज कोसळलेला जोड रस्त्याच्या संरक्षक भिंतीचा भाग धोकादायक श्रेणीत नव्हता. तरीही येथील भिंत कोसळल्याने चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

""अत्यंत बोगस आणि निकृष्ट कामे करून ठेकेदाराने कणकवलीची वाट लावली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याची भिंत पहिल्याच पावसात कोसळते, हेच उदाहरण आहे. अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने हे प्रकार होत आहेत. त्यामुळे आम्हाला आता परत रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.''
- नीतेश राणे, आमदार

""शहरातील चौपदरीकरण कामाच्या दर्जाबाबत या आधीही कणकवलीकरांकडून तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आज भिंत कोसळली, ही बाब गंभीर असल्याने तूर्तास शहरातील चौपदरीकरणाचे सर्व काम बंद ठेवण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले आहेत.''
- वैशाली राजमाने, प्रांत कणकवली

 

 

संबंधित बातम्या