माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

जेष्ठ न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा निरोप घेतला.

पुणे : जेष्ठ न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा निरोप घेतला. ते 91 वर्षाचे होते. पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी न्यायमूर्ती असताना अनेक ऐतिहासीक निर्णय दिले होते. तसेच ते पुण्यातील  पहिल्या एल्गार परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते.

न्यायमूर्ती सावंत यांनी मुबंई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकीली केली. 1973 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. तर 1986 साली सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश झाले. तत्कालीन राज्य सरकारमधील पद्मसिंह पाटील, नवाब मलिक, सुरेश जैन, विजयकुमार गावीत यांच्यावर झालेल्या कथित भ्रष्टाचार आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे अध्यक्ष पी. बी. सावंत होते.

 2005 मध्ये त्यांनी आपला अहवाल तत्कालिन राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालानुसार आताचे मंत्री नवाब मलिक,पद्मसिंह पाटील, सुरेश जैन यांच्यावर आरोप सिध्द झाले होते. तर विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले होते. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर नवाब मलिक, सुरेश जैन यांना राजीनामा द्यावा लागला होता. 1982 मध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी प्रकरणात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.  

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी म्हटले, ''न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे देश एका महान विधिज्ञास मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली'' असं ट्विट करत त्यांनी शोक व्यक्त केला आहे. 
 

संबंधित बातम्या