चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्रात आंदोलन

Dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

काळ्या फिती लावून महाराष्ट्र राज्य सरकारचा निषेध

मुंबई

वैद्यकीय शिक्षण विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ केला असून, आजपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. त्याचबरोबर दुपारच्या सुट्टीत मुंबईतील 5 आणि उर्वरित महाराष्ट्रातील 14 रुग्णालयांबाहेर तीव्र निदर्शने देखील करण्यात आली. यात 100 टक्के कर्मचारी सहभागी झाले. जे. जे. रुग्णालयातील 9 संघटना मिळून निर्माण केलेल्या कृती समितीचाही त्यात सहभाग होता. हे आंदोलन 2 जुलैपर्यंत असेल. त्यानंतर दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आपला निषेध आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवला जाईल, अशी माहिती राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचाही पाठिंबा मिळाला आहे. या परिचारिकाही संपूर्ण ताकदीनिशी आंदोलनात 100 टक्के सहभागी झाल्या आहेत.
राज्य सरकारने अध्यादेशाद्वारे द्वितीय ते तृतीय श्रेणीपर्यंतची पदे सरळसेवा भरतीने करायचा निर्णय घेतला आहे. केवळ चतुर्थ श्रेणीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. ही 3632 पदे असून, त्यात सध्याचे 1981 वर्षांपासूनचे 922 बदली कामगार, तसेच आरोग्य आस्थापनावरील राजीव गांधी जीवनदायी योजनेतील कामगारांना कायम करणे किंवा प्रलंबित असलेले वारसाहक्क व अनुकंपा तत्त्वावरील पदे यांचा कुठलाही समावेश नाही. याबाबत वर्षानुवर्षे पाठपुरावा करत असूनही काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या अन्यायाबाबत कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत आंदोलन केले आहे.

राज्य सरकारने 2 जुलैपर्यंतच्या आंदोलनानंतरही त्याची दखल घेतली नाही तर 3 ते 5 जुलै दररोज दोन तास "काम बंद' आंदोलन केले जाईल. त्यानंतर 7 जुलैला संपूर्ण दिवस "काम बंद' आंदोलन करण्यात येणार आहे. आजच्या या 100 टक्के यशस्वी झालेल्या आंदोलनानंतरही अद्याप सरकारने त्याची दखल घेतली नाही, संघटनेचा चर्चेसाठी निमंत्रित केले नाही, त्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष आहे.
- भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, राज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना.

संबंधित बातम्या