वाढदिनी दोन मित्रांवर काळाचा घाला

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

आडेली धरणात बुडून मृत्यू; मृत दोघेही मळगावातील

वेंगुर्ले

आपल्या वाढदिवसादिवशी वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या सावंतवाडी तालुक्‍यातील मळगाव-जाधववाडी येथील दोन युवकांचा आडेली धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आज उघड झाला. मिलिंद मधुकर जाधव (वय 27) व अमोल गौतम मळगावकर (वय 30) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस पंचनामा व विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या संदर्भात मिलिंद जाधव याचा चुलत भाऊ राजन जाधव यांनी दिलेल्या वर्दीनुसार येथील पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मळगाव-जाधववाडी येथील मिलिंद व अमोल या दोघांचे बुधवारी (ता. 24) वाढदिवस होते. वाढदिवस त्यांनी मित्रांसोबत साजरे केले. त्यानंतर पाचच्या सुमारास ते दोघेही मोटारसायकलने निघून गेले; मात्र रात्री दहापर्यंत न आल्याने त्या कुटुंबातील व शेजारी आणि वाड्यातील लोकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही यश आले नाही. कदाचित ते आडेली धरणावर पोहण्यास जाण्याची शक्‍यता एका व्यक्तीने वर्तविली. त्याचा अंदाज घेत सकाळी दोन ग्रामस्थ आडेली धरणाच्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल (एमएच-07-एएल-4561) धरणाच्या कठड्यावर आढळून आली. त्यानुसार शोध घेता घेता एका ठिकाणी त्यांचे कपडे, मोबाईल, पैशाचे पाकीट, चप्पल आदी वस्तू आढळल्या. त्यानुसार त्यांनी गावात कळविले व गावातील नातेवाईकांसह ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले.
दरम्यान, याची माहिती मिळताच मळगाव, आडेली, कांबळेवीर या ठिकाणच्या त्यांच्या नातेवाईकांनी तसेच ग्रामस्थांनी धरण परिसरात एकच गर्दी केली होती. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ संतोष पेडणेकर यांनी पोलिसांना कळविल्यानुसार पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, कॉन्स्टेबल डी. बी. पालकर, सचिन सावंत, प्रमोद काळसेकर, सूरज रेडकर, नितीन चोडणकर, सूर्याजी नाईक, सुरेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
येथील नगराध्यक्ष दिलीप गिरप, तहसीलदार प्रवीण लोकरे, सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, आडेली सरपंच समिधा कुडाळकर, समीर कुडाळकर, मंडल अधिकरी पी. एस. पेस्ते, तलाठी चारुशीला वेतोरकर, पोलिसपाटील संजना होडावडेकर, आरोग्य सेवक शेखर कांबळी, मळगाव पोलिसपाटील रोशनी जाधव, मळगाव सरपंच कृष्णा गावडे, मळगाव शाखाप्रमुख महेश डिचोलकर, सावंतवाडीचे माजी पंचायत समिती सदस्य राजू परब, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, बाळा दळवी, प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
दुपारी अडीचच्या सुमारास अमोल व मिलिंद यांचे मृतदेह धरणातील पाण्यात तरंगू लागले. ते वाऱ्याने किनारी येताच ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी वर घेत पोलिस पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यान, पोलिस यंत्रणेने बुडालेल्या व्यक्तींना काढण्यासाठी मालवण येथील दामोदर तोडणकर आपत्कालीन स्कूबा टीम, तसेच येथील सागरी दल सदस्यांना पाचारण केले होते.

एका चित्रकाराचा अस्त
मिलिंद एकुलता एक होता. तो उत्तम चित्रकार होता. गणेशमूर्तीही घडवायचा. त्याच्या मागे आई, वडील, काका, काकी, चुलत भाऊ, वहिनी असा परिवार आहे. मळगाव पोलिसपाटील रोशनी जाधव यांचा तो चुलत दीर होता. अमोल मळगावकर, मळगाव येथील फॅब्रिकेशनमध्ये कामाला होता. त्याच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पुतणे, काका, काकी असा परिवार आहे.

संबंधित बातम्या