अनैतिक संबंधाचा संशय; मित्राचा खून

अवित बगळे
मंगळवार, 21 जुलै 2020

पारगावात भर रस्त्यावर चाकूने वार; सहा तासांतच दोघांना अटक
 

खंडाळा

पत्नीबरोबरच्या अनैतिक संबंधाचा संशय घेऊन झालेल्या किरकोळ भांडणातून पारगाव येथील एसटी डेपो परिसरात भर रस्त्यावर चाकूने सपासप वार करत खंडाळ्यातील युवकाचा त्याच्याच मित्राने खून केला. काल रात्री नऊ वाजता घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या सहा तासांतच पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. या दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
असिफ गुलाब शेख (वय 23, रा. आदित्य सोसायटी, खंडाळा) असे मृताचे नाव असून, अक्षय सुनील मोहिते (वय 23, रा. अजनूज, ता. खंडाळा) व अमित शिवाजी चव्हाण (वय 24, रा. पारगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले, की अक्षय, अमित व असिफ हे तिघे मित्र आहेत. काल रात्री जेवायला घेऊन जातो म्हणून अक्षय हा असिफला पारगावी घेऊन गेला. त्या वेळी पत्नीबरोबरच्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरून अक्षयने असिफच्या छाती व मांडीवर चाकूने सपासप वार केले. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असिफचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी अमित चव्हाण हाही तेथे उपस्थित होता. अक्षय हा एका हाताने अपंग असूनही खून केल्यानंतर त्याने मोटारसायकलवरून पोबारा केला. या प्रकरणी असिफचा भाऊ अल्ताफ शेख याने फिर्याद दिली. पोलिसांनी अमितला घटनास्थळीच ताब्यात घेतले. ही घटना खंडाळा-अजनूजच्या भर रस्त्यावर व दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात घडली. पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे व शिरवळचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्री. हजारे यांच्यासह शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार, पोलिस हवालदार गिरीश भोईटे, संजय धुमाळ, तुषार कुंभार, विठ्ठल पवार व भुईंजचे श्री. कदम यांनी काल रात्री वाईतील केंजळ येथील एमआयडीसीतील पत्र्याच्या शेडमधून अक्षयला ताब्यात घेतले. अवघ्या सहा तासांतच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक स्वाती पवार तपास करीत आहेत.

 

संबंधित बातम्या