गणेशोत्सवावर वादळी पावसाचे सावट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

हवामान खात्याचा इशारा; तूर्तास जोर ओसरला

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला; मात्र प्रादेशिक हवामान विभागाने 21 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा तसेच 21 ला जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीवर पावसाचे सावट राहणार आहे. तिलारी नदीचे पाणी इशारा पातळीजवळ आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दोडामार्ग तालुक्‍यातील तिलारी नदीच्या पाण्याची पातळी 41.20 मीटर इतकी झालेली आहे. इशारा पातळी 41.6 मीटर असून धोका पातळी 43.6 मीटर आहे. तिलारी धरणाची पाणी पातळी 110.1 मीटर झाली आहे. पातळी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.

सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्‍यात सर्वाधिक 122 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्याची सरासरी 82.150 असून आतापर्यंत एकूण सरासरी 3507.069 मिलीमीटर आहे. दोडामार्गात 91 मिलीमीटर, सावंतवाडीत 122, वेंगुर्लेत 58.20, कुडाळात 67, मालवणात 57, कणकवलीत 117, देवगडात 30 तर वैभववाडीत 115 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे.

असा आहे धोका
जिल्ह्यात आज (ता. 18) मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. ता. 19 व 20 ला मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. ता. 21 ला पुुन्हा मुसळधार ते अती मुसळधारची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ता. 21 पर्यंत दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहणार आहे. तरी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. याबाबत आवश्‍यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने केले आहे.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या