गणपतीपुळे किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कोणत्या?

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

तेरा वर्षांमध्ये २८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची ओळख धोकादायक समुद्रकिनारा म्हणून झाली होती; मात्र ती आता बदलून, सुरक्षित किनारा अशी नवी ओळख या किनाऱ्याला मिळत आहे.

रत्नागिरी : तेरा वर्षांमध्ये २८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची ओळख धोकादायक समुद्रकिनारा म्हणून झाली होती; मात्र ती आता बदलून, सुरक्षित किनारा अशी नवी ओळख या किनाऱ्याला मिळत आहे. गेल्या वर्षभरात ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे एका वर्षात आठ दुर्घटनांमध्ये २५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. आणि फक्त एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. आता पर्यटकांनी खबरदारी घेतल्यास देवदर्शनानंतर समुद्रात मनसोक्त डुंबण्याचा आनंद त्यांना घेता येणार आहे.

पर्यटकांचा हेतू काय?

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्याचे काम विविध स्तरांवर सुरू आहे. लॉकडाउननंतर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. पर्यटनासाठी कोकणाला पर्यटकांनी जास्त पसंती दर्शविली आहे. त्यात देवदर्शन आणि समुद्रकिनारी भटकण्याचाआनंद असा दुहेरी हेतू घेऊन तालुक्‍यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्राला पर्यटकांची जास्त पसंती आहे. दिवसभरात सुमारे १० हजारांहून अधिक पर्यटक गणपतीपुळेला हजेरी लावत आहेत.

का समजले जाते समुद्रकिनाऱ्याला धोकादायक?

गेल्या १३ वर्षात गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर २८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिस स्टेशनमध्ये आहे..पाण्याचा अंदाज घेता किनाऱ्यावर येणारे पर्यटक मौजमजेसाठी समुद्रात उतरतात आणि बुडून मृत्यू पावतात. अशाच घटनांमुळे या समुद्रकिनाऱ्याला धोकादायक म्हणून संबोधलं जात होतं; मात्र आता येथे केलेल्या उपाययोजनांमुळे २०२० या वर्षात एकाच पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. जयगड पोलिस, देवस्थान आणि ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा चांगला परिणाम झाला आहे. आणि या उपाययोजनांमध्ये पोलिस प्रशासनाला यश मिळत आहे.

काय आहे उपाययोजना?

  • पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून धोकादायक स्थितीची माहिती दिली जाते.
  • पुढे किनाऱ्याकडे जाताना धोकादायक किनाऱ्याच्या माहिती मोठ्या बॅनरवर दिसूम येते.
  • समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या नजरेस पडते.
  • किनाऱ्यावरील व्यावसायिकांच्या मदतीने बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण वाचविले जातात.
  • पोलिसांची किनाऱ्यावर चोवीस तास सेवा असते.
  • ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून पर्यटकांच्या कानांवर वारंवार सुचना पडत रहाते.
  • समुद्रकिनाऱ्यावर ग्रामपंचायतीमार्फत जीवरक्षक नेमण्यात आले आहे.

 

"गणपतीपुळे देवस्थान, ग्रामपंचायतीमार्फत जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांना ट्यूब, जॅकेट्‌स, दोरी, सर्च लाईट आदी साहित्य देण्यात आले आहेत. त्याचा वापर पर्यटकांना वाचविण्यासाठी केला जात आहे. पर्यटकांचा बुडून मृत्यू होऊ नये, याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली. त्यासाठीचे मार्गदर्शन अधीक्षक मोहितकुमार गर्ग, देसाई मॅडम, सदाशिव वाघमारे आदी वरिष्ठांनी केले."

- नितीन ढेरे, जयगड सहाय्यक पोलिस निरीक्षक

संबंधित बातम्या