कसालमधील ओव्हर ब्रिजला भेग

अवित बगळे
शुक्रवार, 17 जुलै 2020

वाहतूक थांबवली; चौपदरीकरण कामाचा दर्जा पुन्हा वादात

ओरोस

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील कसाल येथे झालेल्या ओव्हर ब्रिजला मोठी भेग पडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. संभाव्य धोका ओळखून येथील वाहतूकही थांबवण्यात आली आहे. लोकांच्या लक्षात हा प्रकार येऊ नये म्हणून भेगाळलेल्या भागात डांबर भरून मलमपट्टी करण्यात आली होती. महामार्गाच्या चौपदरीकरण कामातील दर्जाबाबत आरोप होत असतानाच हा प्रकार समोर आला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे; मात्र काम पहिल्यापासूनच वादात सापडले आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भराव घालण्यात आला आहे; मात्र त्यासाठी जिल्ह्यातील पावसाच्या पाण्याच्या प्रवाहांचा विचार केलेला नाही. या मार्गावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे येण्या- जाण्याचे नियोजन व्यवस्थित केलेले नाही. परिणामी यंदा मुसळधार पावसाचे पाणी अनेक भागांत घुसले. याबाबतच्या तक्रारी आधीच वाढल्या आहेत. त्यातच आता महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबतही आरोप होत आहेत.
कणकवली येथील ब्रिजचा काही भाग कोसळल्यानंतर याला वाचा फुटली. आता कसालमध्येही नवा प्रश्‍न उभा राहिला आहे. कसाल येथे लांबलचक ओव्हर ब्रिज उभा करण्यात आला आहे. याला मधोमध मोठी भेग गेली आहे. ओरोसहून कणकवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील कॉंक्रिट केलेल्या रस्त्यावर भेग आहे. ही भेग पुलाच्या सुरुवातीपासून पुलाच्या मध्यापर्यंत आहे. सध्या भेग डांबराने भरण्यात आली आहे; मात्र धोका ओळखून मार्ग बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूच्या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. ही स्थिती पाहता कसाल पूलही धोकादायक बनला आहे.
दरम्यान, याबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

भराव खचल्याने भेग पडली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे सुमारे 80 टक्के काम मातीचा भराव टाकून उंची वाढवून करण्यात आले आहे; मात्र हा भराव टाकताना व त्यावर रोलिंग करताना येथील पावसाचा फारसा अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे कसाल येथील भेग गेलेल्या भागातील माती खाली बसली आहे. त्यामुळेच भेग पडली असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

या ब्रिजचेही ऑडिट व्हावे
कणकवलीप्रमाणे कसाल येथील ब्रिजचेसुद्धा ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. मातीचा भर घातलेले ब्रिज धोकादायकच आहे. त्यामुळे येथेही पिलर ब्रिज उभे करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

संबंधित बातम्या