वरवरा राव यांच्यावरील उपचाराची माहिती द्या

अवित बगळे
रविवार, 26 जुलै 2020

नातेवाईकांनी केली मानवाधिकार आयोगाकडे मागणी

हैदराबाद

एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव (वय ८०) यांच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अर्ज केला असून त्यांच्या प्रकृतीची आणि उपचाराची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. तळोजा येथील तुरुंगात असताना वरवरा राव यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच अनेक आजार असल्याने त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे.
मानवी हक्क आयोगाला लिहलेल्या पत्रात म्हटले, की वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यास पोलिस प्रशासनाने नकार दिला आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले आहे, एवढीच माहिती आम्हाला दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यादरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १३ जुलै रोजी एका आदेशान्वये वरवरा राव यांना आवश्‍यक त्या वैद्यकीय सुविधा द्याव्यात आणि त्याची माहिती नातेवाईकांना द्यावी असे सांगितले होते. परंतु पोलिस प्रशासनाकडून आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणात मानवी हक्क आयोगाने हस्तक्षेप करुन दर सहा तासाला वरवरा राव यांच्या प्रकृतीची आणि उपचाराची माहिती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. वरवरा राव यांच्यावर १६ जुलैपासून नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

संबंधित बातम्या