गरीब विद्यार्थ्यांना आधी टॅब द्या

Dainik Gomantak
रविवार, 14 जून 2020

ऑनलाईन शिक्षणासाठी मागणी

मुंबई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे; परंतु गोरगरीब पालकांकडे मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल, टॅब अशी साधने नसतात. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील शालेय विद्यार्थ्यांना सरकारने आधी टॅब द्यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. शाळांमध्ये पुरेशी जागा आणि मैदान नसल्यामुळे कोरोनाचे संकट असेपर्यंत वर्ग भरणे कठीण असल्याचे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गांत पाठवण्यात आले. दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. दरवर्षी राज्यातील शाळा 15 जूनपासून भरतात; पण यंदा कोरोनाचे संकट आल्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु गरीब पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्‍यक साधने उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
हातावर पोट असलेले पालक पोटाला चिमटा काढून मुलांना शिक्षण देत होते. लॉकडाऊनमध्ये काम गेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. दोन वेळच्या जेवणाचे हाल होऊ लागल्याने लाखो कामगारांनी गावाचा रस्ता धरला. गावांमध्ये वीज, मोबाईल नेटवर्क अशा अनेक समस्या असल्याने मुलांना कसे शिक्षण द्यायचे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. झोपडपट्ट्यांतील मुलांना शिक्षणासाठी पुस्तके, गणवेश असे साहित्यही पालक देऊ शकत नाहीत; अशा मुलांना दानशूर व्यक्ती मदत करत असतात.
शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाचा नारा दिल्याने गरिबांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. गरिबांच्या मुलांना सरकारने तातडीने टॅब उपलब्ध करून द्यावेत, असे शिक्षण अभ्यासक राजेश खंदारे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या