हजार-पाचशे कमी द्या; पण आमची पैठणी घ्या

Dainik Gomantak
गुरुवार, 7 मे 2020

दीड महिन्यात येथील पैठणीची सुमारे 200 कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, विणकरांसह कामगार, कारागीर व विक्रेते अशा 15 हजार जणांसमोर आर्थिक संकट उभे राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

संतोष विंचू

येवला

देश-विदेशात नावलौकिक असलेला येथील पैठणी व साडी व्यवसाय शहराचा अर्थ कणा बनला आहे. मात्र हाच कणा लॉकडाउनमुळे मोडून पडण्याची वेळ आली आहे. दीड महिन्यात येथील पैठणीची सुमारे 200 कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, विणकरांसह कामगार, कारागीर व विक्रेते अशा 15 हजार जणांसमोर आर्थिक संकट उभे राहून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घरगुती विणकाम करणाऱ्यांवर गरजेपोटी दुकानदारांना तयार केलेली पैठणी "पाचशे- हजार कमी द्या; पण पैठणी घ्या' असे म्हणण्याइतपत कठीण अवस्था निर्माण झाली आहे.
पैठणी राजवस्त्र परिधान केलेली स्त्री शंभर जणीत उठून दिसते, इतकं तिचं सौंदर्य मनमोहक आहे. आठ-दहा वर्षांत तर या पैठणीने येवलेकरांचा अर्थकारणाचा कणाच भरभक्कम केला. मात्र स्वप्नातही विचार केला नसेल, अशी आपत्ती आली आणि त्यामुळे संपूर्ण शहरात हा व्यवसाय कुलूपबंद झाला असून, अर्थव्यवस्थेचे गणितच मोडून पडले आहे.

गरजूंसाठी हात रिते...
अनेक हातावर कुटुंब असलेले विणकर आठवड्याला पैठणी विकतात आणि घरखर्च चालवतात, अशांची तर मोठी अडचण झाली आहे. बंदमुळे तयार पैठणी घ्यायला विक्रेते तयार नाहीत. त्यामुळे कमी दरात का होईना ती घ्या, असा आग्रह ते विक्रेत्यांकडे करताना दिसतात. समाधानाची बाब म्हणजे कापसे, सोनी, भांडगे, तारांगणसह सर्वच मोठ्या विक्रेत्यांनी आजही सर्वसामान्य विणकरांना मनमोकळेपणाने आर्थिक आधार दिल्याने कुटुंबीयांना जगण्याचा आधार मिळाला आहे. मात्र नियमित व्यवसाय ठप्प झाल्याने जगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कच्चा माल संपला...
लॉकडाउनपर्यंत शहरात असलेले जर, रेशीम संपले आहे. वाहतूक बंद पडल्याने रेशीम, जरीसारखा कच्चा माल शहरात येणे बंद झाले आहे. रेशीम बेंगळूरूहून, तर जर सुरतहून येते. आता कच्चा मालच नसल्याने आज 42 दिवसांपासून पैठणीचे हातमाग धूळ खात पडले असून, रंगणी, सांधणी करणाऱ्यांसह ऑनलाइन विक्री करणारे 500 वर हातही रिकामे बसले आहेत.

हंगामच हिरावला...
फेब्रुवारी ते जून हा लग्नसराईमुळे पैठणी व साड्यांच्या विक्रीचा कालावधी असतो. मात्र, हा पेरणीचा कालावधीच बंद मध्ये हरवल्याने पूर्ण वर्षाच्या नुकसानीला विणकर व विक्रेत्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कोट्यवधींच्या पैठणी आज दुकानांमध्ये पडून आहे. या संकट काळात आर्थिक आधार देण्याची मागणी विणकर करत आहेत.

आमचे दुकान व हातमागावरील तीनशेहून अधिक कारागीर आज रिकामे बसले आहेत. अर्थात, आम्ही त्यांची आर्थिक गरज भागवत आहोत. दोन महिने होत आल्याने व लग्नाचा हंगामात हिरावला गेल्याने पैठणीला कोट्यवधीचा तोटा झालाच; पण जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहिली, तर 30 टक्के हातमाग कायमचे बंद पडतील.
- दिलीप खोकले, संचालक, कापसे पैठणी

साडीला ग्राहक नाही अन्‌ हाताला काम नसल्याने विणकर सैरभैर झाला आहे. पैठणी व्यवसायच ठप्प झाला आहे. तेजीचा हंगाम कुलूपबंद झाल्याने पुढील वर्षाची चिंता या व्यवसायाला पडली आहे. साडी गरजेची असल्याने लॉकडाउननंतर स्थिती पूर्वपदावर येण्याचा आशावाद आहे. "नाबार्ड'मार्फत विणकरांना कमी दरात रेशीम विक्री करण्यात यावी.
- राजेश भांडगे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पैठणी विणकर

दोन महिन्याने वर्षाची घडी विस्कळित केली आहे. शहरातील दोन ते अडीच हजार कुटुंबाला या मंदीचा फटका बसत आहे. लग्नाचा हंगाम गेल्याने आता दिवाळीनंतरच पैठणी व्यवसाय ऊर्जितावस्था घेऊ शकेल. विणकरांना शासनाने कच्चा माल उपलब्ध करून आर्थिक मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
- निशांत सोनी, संचालक, सोनी पैठणी, येवला

पैठणीच्या गावात...
-अवलंबून कुटुंब- 2500
- अंदाजे हातमाग- 5000
- सर्व विणकर- 8000
- विणकर, कारागीर व इतर- 15000
- रेशीम विक्रेते- 10
- महिन्याला लागणारे रेशीम- 4000 किलो
- महिन्याला लागणारे जर- 500 किलो
- सांधणी करणारे कारागीर- 200
- रेशीम उकलणारे कारागीर- 150
- रंगणी कारागीर- 12
- विक्रेते- शोरूम- सहा व इतर 150 पर्यत
- अवलंबून गावे- येवला, नागडे, बल्हेगाव, जळगाव नेऊर, आडगाव चोथवा, सुकी, अंगणगाव, मातुलठाण, बाभूळगाव

संबंधित बातम्या