गोवा प्रवेश सुकर; पण कोरोना टेस्टसाठी दोन हजार

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

अडीच महिने पगार नसलेल्यांसाठी संकटच

बांदा

गेले अडीच महिने लॉकडाउनमुळे सिंधुदुर्गात अडकलेल्या व गोव्यात विविध खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मुला-मुलींना अखेर गोव्याने आपल्या राज्यात प्रवेश दिला आहे. त्यांची दोन हजार रुपये घेऊन म्हापसा येथील सरकारी रुग्णालयात कोरोना टेस्ट घेण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना तत्काळ कामावर रुजू करून घेण्यात येणार आहे.
लॉकडाउननंतर गोव्यात कामाला असलेले सिंधुदुर्गातील अनेकजण जिल्ह्यातच होते. तिकडे त्यांच्या कंपन्या हळूहळू सुरू झाल्या; मात्र त्यांना पुन्हा गोव्यात प्रवेश मिळत नव्हता. गोवा सरकारच्या विविध निकषामुळे ही स्थिती ओढवली होती. तरुणांच्या नोकऱ्या जाण्याची भीती होती. याबाबत "सकाळ'ने वृत्त दिले. त्याची दखल घेऊन विविध लोकप्रतिनीधींनी गोवा सरकारशी चर्चा केली. जिल्हा प्रशासनही सक्रिय झाले. "सकाळ'ने याचा पाठपुरावा केला. या सगळ्याचे फलीत म्हणून आता गोवा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे; मात्र अजूनही या तरुणांना वैयक्तिक दोन हजार रुपये भरून कोरोना टेस्ट करून घ्यावी लागत आहे.
गोव्यात कामाला असलेले सात हजारहून अधिक युवक-युवती जिल्ह्यात अडकले होते. महाराष्ट्र-गोवा सीमा सील असल्याने या मुलांना गोव्यात प्रवेश मिळत नव्हता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून देखील यासाठी प्रयत्न करण्यात आला. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्‍नाबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली होती. दोन दिवसांपूर्वीच आमदार नीतेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने सीमेवर पत्रादेवी येथील गोव्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन गोव्यात प्रवेश देण्याची मागणी केली होती.
यानंतर गोव्यातील प्रवेशाबाबतचे निकष शिथिल झाले. टेस्ट निगेटिव्ह आल्यास क्वारंटाईनची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रक्रियाही सोपी करण्यात आली. ई-पासची गरज नसल्याचीही स्पष्ट करण्यात आले. यानंतर कालपासून सिंधुदुर्गातून तरुण गोव्यात जाण्यास सुरूवात झाली. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकजण गोवा हद्दीत दाखल झाले. यावेळी त्यांना दोन हजार रुपये घेऊन कोरोना तपासणीसाठी म्हापसा-गोवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना तपासणी करून घेण्यासाठी लांबच-लांब रांग लागली होती. कालपासून हा प्रवेश सुरू करण्यात आला आहे. तपासणीसाठी गोमंतकीयांसोबतच सिंधुदुर्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, बांदा, दोडामार्ग व कर्नाटकमधील लोकांच्या रांगा लागल्या होत्या. या चाचणी घेण्यासाठी विलंब लागत असल्याने गर्दी वाढत गेली. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर म्हापसा पोलिसांना पाचारण करावे लागले होते.

मार्ग काढण्याची मागणी
गोव्याने कोरोना कालावधीत बहुसंख्य सुविधा पैसे आकारून दिल्या होत्या. त्यांच्याकडे क्‍वारंटाईनलाही शुल्क आकारले होते. आता कोरोना टेस्टसाठी सुध्दा दोन हजार भरून घेतले जात आहे. दोन-अडीच महिने पगार नसलेल्या तरुणांसाठी ही रक्‍कम जमा करणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यातून मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या