दमदार पावसासाठी जुलै उजाडणार

Dainik Gomantak
रविवार, 28 जून 2020

वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम

मुंबई

मान्सून काही दिवस लवकर दाखल झाला असला, तरी अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यासह मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले. मात्र या आठवड्यात पावसाने दडी मारली. मुंबईकरांना दमदार पावसासाठी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम होत आहेत.
कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले असले, तरी मुंबईत पाहिजे तितका पाऊस झालेला नाही. मुंबईच्या विविध भागांत रात्री आणि पहाटे पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडून जातात. मुंबईत पावसाचे आगमन वेळेत झाले; पण नंतर त्यात खंड पडला. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढत आहे. ही आर्द्रता 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे दिवसा तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस जरी असले, तरी ते खूप असह्य होत आहे. वाढते तापमान आणि आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम होत आहे, अशी माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. दरम्यान येत्या 24 तासांत आकाश ढगाळ राहणार असून पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित बातम्या