राज्यपालांचे राज भवनला खर्च कपातीचे निर्देश

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी गुरुवारी राज भवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राज भवन प्रशासनाला केल्या आहेत.

मुंबई

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडे संसाधन उपलब्ध व्हावे, या दृष्टीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी गुरुवारी राज भवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात विविध उपाययोजनांद्वारे कपात करण्याच्या सूचना राज भवन प्रशासनाला केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे राज भवनाच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 ते 15 टक्के बचत होईल असा अंदाज आहे.
दरम्यान, आपले एक महिन्याचे वेतन तसेच आगामी एक वर्षभर आपले 30 टक्के वेतन कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान कोषाला देण्याचे राज्यपालांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

राज्यपालांनी सुचवलेल्या काही उपाययोजना
1. राज भवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करण्यात येऊ नये. केवळ प्रगतिपथावर असलेली चालू कामेच पूर्ण करावी.
2. पुढील आदेशांपर्यंत राज भवन येथे येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतिचिन्ह देऊ नये.
3. पुढील आदेशापर्यंत राज भवन येथे कोणतीही नवी नोकर भरती करू नये.
4. स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला 15 ऑगस्ट रोजी पुणे येथील राज भवन येथे राज्यपाल आयोजित करीत असलेला स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा.
5. राज भवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा.
6. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी. राज भवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट, तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये.
7. कुलगुरू व अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी.

संबंधित बातम्या