बारदाना नसल्याने धान्य खरेदी रखडली

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

लॉकडाउनचा फटका; राज्यात मागणी करूनही मिळेना धान्य भरण्यासाठी बारदाना

भारत नागणे
पंढरपूर

सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु, धान्य साठवून ठेवण्यासाठी धान्य खरेदी केंद्रांत अद्याप बारदाना उपलब्ध नसल्याने राज्यातील धान्य खरेदी रखडली आहे. पंढरपूर तालुक्‍यासाठी मका खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येथील मका खरेदी केंद्राने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे किमान पाच हजार बारदान्याची मागणी केली आहे. मागणी करूनही बारदाना उपलब्ध होत नसल्याने हमी भावाने धान्य खरेदी योजना रखडली आहे. लॉकडाउनने बारदाना निर्मिती कारखाने बंद असल्याने बारदान्याची टंचाई निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावर्षी दुष्काळ, गारपीट आणि त्यानंतर कोरोना संकटाने राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतीमालाची खरेदी करणे बेकायदेशीर असताना सर्रासपणे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करत आहेत. यात व्यापारी मालामाल तर शेतकरी कंगाल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला हमीभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु, खरेदी केलेले धान्य साठवून ठेवण्यासाठी अनेक खरेदी केंद्रांत बारदानाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धान्याची खरेदी रखडली आहे.
पंढरपूर येथे आठ दिवसांपूर्वीच मका खरेदी केंद्र सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना नाव नोंदणीचे आवाहन केले; परंतु खरेदी केंद्रात बारदाना उपलब्ध नसल्याने सध्या खरेदी बंद आहे. येथील खरेदी-विक्री संघाने मका साठवणुकीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे 50 किलोच्या सुमारे पाच हजार सुतळी बारदान्याची मागणी केली आहे. अद्याप बारदाना उपलब्ध झाला नसल्याने येथील मक्‍याची खरेदी रखडली आहे. बारदान्याअभावी राज्यभरात अनेक ठिकाणी हमीभावाने धान्याची खरेदी रखडली आहे. राज्य सरकारने खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केली आहे.

राज्य सरकारने पंढरपूर येथे मका खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून धान्याची साठवणूक करण्यासाठी बारदाना पुरवला जातो. यावेळी मागणी करूनही अद्याप बारदाना मिळाला नाही. त्यामुळे धान्य खरेदी करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. पंढरपूरसाठी किमान पाच हजार बारदान्याची गरज आहे.
- शांतीनाथ बागल, अध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, पंढरपूर

संबंधित बातम्या