शंभरीतील आजोबांनी हरवले कोरोनाला

grandfather celebrates birthday
grandfather celebrates birthday

देवगड

नारिंग्रेचे वयाचे शतक झळकवलेले अर्जुन गोविंद नारिंग्रेकर सेवानिवृत्त शिक्षक. आज त्यांनी 101 वा वाढदिवस साजरा केला आणि कोरोनावर मातही. त्यांच्या या जिद्दीला जोगेश्‍वरीच्या (मुंबई) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या डॉक्‍टर आणि स्टाफने केक कापून सलाम केला.
कोरोनाने भल्या भल्यांच्या मनात भीतीचा गोळा निर्माण केला आहे. कोरोना म्हणजे मृत्यू असा विचित्र समज अख्ख्या समाजाचे मनोधैर्य ढासळवत आहे; पण नारिंग्रेकर आजोबांनी मोठ्या जिद्दीने कोरोनाचा केलेला पराभव प्रेरणादायीच म्हणावा लागणार आहे.
श्री. नारिंग्रेकर आजोबांचा जन्म 15 जुलै 1920 चा. ते मूळचे देवगड तालुक्‍यातील नारिंग्रेचे. त्यांनी मिठबांव, दहिबांव, विजयदुर्ग, कोळोशी, नारिंग्रे अशा विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. ते 31 जुलै 1978 ला मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कार्यरत आहेत. सध्या ते आपल्या मुलाकडे कांदिवली परिसरात राहतात. त्यांच्या घरातील काही व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आणि त्यानंतर आजोबांनाही लक्षणे दिसू लागली. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर आजोबांना न्यूमोनियादेखील असल्याचे लक्षात आले आणि मग अतिदक्षता विभागात आजोबांवर उपचार सुरु झाले.
घरच्या सगळ्याच मंडळींच्या काळजाचा ठोका चुकला. आजोबांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर लगेचच एक जुलैला त्यांना मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजोबांचे वय लक्षात घेता, रुग्णालयातील डॉक्‍टरांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली. आजोबांनी देखील चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. उद्या (ता. 15) 101 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या आजोबांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तो त्यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करतच. कोरोनावर मात करणाऱ्या या आजोबांनीही आपल्या खणखणीत आवाजात डॉक्‍टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत कांदिवलीतील आपल्या घराकडे कूच केली.

कडक शिस्तीने पळवला
शिक्षक असणाऱ्या आजोबांचा खणखणीत आवाज आणि कडक शिस्तीचा अनुभव रुग्णालयातील डॉक्‍टरांनी आणि कर्मचाऱ्यांनीही घेतला. जेवणाच्या आणि औषधाच्या वेळा काटेकोरपणे पाळणाऱ्या आणि डॉक्‍टरांच्या सूचना लक्षपूर्वक ऐकून अमलात आणणाऱ्या आजोबांची कोरोनाशी सुरु असलेल्या लढ्यात सरशी झाली. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा कर्मचाऱ्यांनी आवर्जून त्यांचे आशीर्वाद घेतले. नारिंग्रेकर यांनीही रुग्णालयातील सर्वच डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांचे भरभरुन आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com