अविवाहित असल्यामुळे गर्भपाताची परवानगी द्या 

Dainik Gomantak
सोमवार, 1 जून 2020

तरुणीची हायकोर्टामध्ये याचिका

मुंबई

 प्रेमप्रकरणातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात गर्भपात करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. सध्या अविवाहित असल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी तिने मागितली आहे.
कोकणात राहणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणीने न्यायालयात याचिका केली आहे.तिचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांच्यामध्ये सहमतीने शारीरिक संबंधही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगळे झाले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी तरुणीला कळले की ती गर्भवती आहे. गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी आहे. मात्र त्यानंतर गर्भपात करावयाचा असल्यास उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. याचिकादार तरुणी सध्या 23 आठवड्यांची गर्भवती आहे. अविवाहित सिंगल वुमन असल्यामुळे सामाजिक अप्रतिष्ठा होऊ शकते, त्यामुळे बाळाला सांभाळू शकत नाही, तरी गर्भपात करण्याची परवानगी द्यावी, कायद्यानुसार अशा परिस्थितीत गर्भपात करण्याची परवानगी मिळू शकते, अशी मागणी याचिकादाराच्या वतीने करण्यात आली. याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे नुकतीच व्हिडीओ कौन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. खंडपीठाने याचिकेची दखल घेऊन तातडीने तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तिचा वैद्यकीय अहवाल ई-मेलद्वारे पाठविण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या