मुंबईत स्थलांतरीतांना शिधावाटप

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

मुंबई महापालिकेने तीन लाखांहून अधिक कामगारांना महिनाभर दिवसातून दोन वेळा जेवणाचे वाटप केले होते. त्यासाठी तब्बल 800 कर्मचारी राबत होते. धारावी परिसरात अन्नवाटपाची जबाबदारी असलेले महादेव हरयाण यांचा काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला; तर एका कर्मचाऱ्याला बाधा झाली होती.

समीर सुर्वे
मुंबई

स्थलांतरित कामगारांच्या परतीच्या वाटा बिकट झाल्या असताना मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कामगारांना शिजवलेल्या अन्नाऐवजी शिधा देण्यात येत असून, त्यासाठी यादी तयार केली जात आहे. बेघरांना पूर्वीप्रमाणेच तयार जेवण मिळणार असून, घर असलेल्या कामगारांना रेशन देण्यात येईल. साधारणत: एक लाख कामगारांना शिधा देण्याची तयारी महापालिकेने केली आहे.
मुंबई महापालिकेने तीन लाखांहून अधिक कामगारांना महिनाभर दिवसातून दोन वेळा जेवणाचे वाटप केले होते. त्यासाठी तब्बल 800 कर्मचारी राबत होते. धारावी परिसरात अन्नवाटपाची जबाबदारी असलेले महादेव हरयाण यांचा काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला; तर एका कर्मचाऱ्याला बाधा झाली होती. त्याच काळात केंद्र सरकारने कामगारांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेने अन्नवाटप थांबवले होते, परंतु स्थलांतरित कामगारांच्या परतीची वाट अवघड असल्यामुळे महापालिकेने शिधावाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका या स्थलांतरित कामगारांच्या जेवणासाठी रोज एक कोटी 80 लाख रुपयांपर्यंत खर्च करत होती. अनेक वेळा कामगारांनी शिजवलेल्या अन्नाबाबत नाराजी व्यक्त केली होती. रोज सहा लाख व्यक्तींसाठी जेवण तयार करणेही जिकिरीचे होते. त्यामुळे महापालिका आता कामगारांना शिजवलेले अन्न न देता रेशन देणार आहे. हा निर्णय योग्य आहे. माझ्या विभागातील स्थलांतरित कामगारांची यादी करून पाठवली आहे, असे अंधेरी पश्‍चिम येथील नगरसेविका राजूल पटेल यांनी सांगितले.

शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना रेशन मिळते; मात्र स्थलांतरित कामगारांना मिळत नाही. मुंबईत राहण्याची सोय असलेल्या कामगारांना रेशन देण्यात येईल. आतापर्यंत 70 हजार कामगारांची यादी तयार झाली आहे, असे सुमारे एक लाख कामगार असतील. राहण्याची सोय नसलेल्या आणि बेघरांना तयार जेवण देण्यात येईल.
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
 

संबंधित बातम्या